जलयुक्त शिवारमुळे पिकांना मिळाली संजीवनी



v 98 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय
यवतमाळ, दि. 26 : गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी यवतमाळ जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. खरीप हंगामासाठी जुन - जुलै महिन्यात पडलेला पाऊस उपयुक्त ठरला. मात्र ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पावसाचा खंड पडल्यामुळे हातचे पीक जाते की काय, अशी परिस्थिती असतांनाच साखरा शिवारात (ता. घाटंजी) जलयुक्तच्या पाण्यामुळे पिकांना संजीवनी मिळाली. या पाण्यामुळेच यंदाचे पीक तरले, अशी प्रतिक्रिया शेतक-याने दिली.
साखरा येथील केशव देवराव चौधरी यांच्याकडे साडेपाच एकर शेती आहे. यावर्षी त्यांनी कापूस आणि तूर लावली. सुरवातीला चांगला पाऊस झाला. शेतात पीकेसुध्दा डोलू लागली. मात्र उत्पादन येण्याच्या वेळीच परतीच्या पावसाची आवश्यकता होती. या पावसाने दडी मारल्याने हातचे पीक जाते की काय, असे केशव चौधरी यांना व शिवारातील शेतक-यांना वाटत होते. मात्र साखरा शिवारात नाला खोलीकरण केल्यामुळे त्यात पाणीसाठा झाला. त्यामुळे परिसरातील पाण्याची पातळीसुध्दा वाढली. विशेष म्हणजे हा पाणीसाठा सिमेंट नाला बांधातून ओव्हर फ्लो होऊ लागला. पावसाचा खंड पाहता केशव चौधरी यांनी इंजिन लावून साडेपाच एकरातील कपाशी आणि तूरला पाणी दिले. त्यामुळे पीक हाती आले. जलयुक्त शिवारचा उपयोग शेतीला झाला. जवळपास 50 क्विंटल कापूस आणि 6-7 क्विंटल तूर होण्याची शक्यता असल्याचे चौधरी यांनी सांगितले.
जिल्ह्यात जलयुक्तमुळे 98 हजार हेक्टरवर सिंचनाची सोय
सन 2019 पर्यंत टंचाईमुक्त महाराष्ट्र करण्यासाठी राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान हा महत्वाकांक्षी कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यानुसार गत चार वर्षांत मोठ्या प्रमाणात जलयुक्त शिवारची कामे करण्यात आली आहे. यवतमाळ जिल्ह्यात सन 2015-16 आणि 2016-17 आणि 2017-18 मध्ये जलयुक्तची एकूण 40 हजार 516 कामे पूर्ण करण्यात आली आहे. यातून जिल्ह्यात 98 हजार 58 हेक्टरवर सिंचनाची सुविधा निर्माण झाली आहे.     
सन 2015-16 मध्ये 413 गावांमध्ये 23 हजार 377 कामे, सन 2016-17 मध्ये 225 गावांमध्ये 3 हजार 541 कामे तर 2017-18 मध्ये 16 हजार 54 अशी तीन वर्षात एकूण 42 हजार 972 कामे हाती घेण्यात आली.  यापैकी 40 हजार 516 कामे पूर्ण झाली आहेत. यातून एकूण 1 लक्ष 14 हजार 17 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाल्याने जिल्ह्यात 98 हजार 58 हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे.  
जिल्ह्यात कृषी विभागासह जलसंपदा, वने, सामाजिक वनिकरण, जिल्हा परिषद सिंचन, लघुसिंचन, भुजल सर्वेक्षण, पाणी पुरवठा या विविध विभागाने अभियानातून कामे हाती घेतली आहे. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत लोकसहभागावर भर देण्यात येत आहे. अशा सहभागातून 10 लक्ष 77 हजार घनमिटर गाळ काढण्यात आला आहे.
000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी