जिल्ह्यातील उर्वरीत 751 गावांमध्ये दुष्काळी सवलती लागू


                              
v आठ सवलती त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या जिल्हाधिका-यांच्या सुचना
यवतमाळ, दि. 23 : सन 2018 च्या खरीप हंगामातील अंतिम पैसेवारी 50 पैशापेक्षा कमी असलेल्या नऊ तालुक्यातील 1297 गावांमध्ये यापूर्वी दुष्काळी सवलती जाहीर करण्यात आल्या होत्या. इतर तालुक्यातील उर्वरीत 751 गावांमध्ये या सवलती जाहीर झाल्या नव्हत्या. आता मात्र या 751 गावांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून आठ सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे. त्या अनुषंगाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी या गावांमध्ये त्वरीत आठ सवलती लागू करण्याच्या सुचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.
जिल्ह्यात 16 तालुक्यातील एकूण गावांची संख्या 2159 असून लागवडीयोग्य गावांची संख्या 2048 आहे. दि. 23 व 31 ऑक्टोबर 2018 च्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील यवतमाळ, बाभुळगाव, दारव्हा, कळंब, महागाव, उमरखेड, राळेगाव, केळापूर आणि मारेगाव या नऊ तालुक्यांमध्ये सन 2018 च्या खरीप हंगामात गंभीर / मध्यम स्वरुपाचा दुष्काळ घोषित करण्यात आला आहे. तसेच 6 नोव्हेंबर 2018 च्या शासन निर्णयानुसार नेर, पुसद व घाटंजी या तीन तालुक्यातील शिरजगाव, मोझर, गौळ (खु.), बेलोरा, शिरोली, शिवणी आणि घोटी या सात महसूल मंडळातील सर्व गावात दुष्काळी सवलती लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार लागवडीयोग्य 2048 गावांपैकी यापूर्वी 1297 गावांमध्ये दुष्काळ घोषित करून उपाययोजना लागू करण्यात आल्या होत्या. त्यामुळे जिल्ह्यातील 751 गावे या सवलतीपासून वंचित होते. मात्र 21 फेब्रुवारी 2019 च्या शासन निर्णयानुसार आता जिल्ह्यातील उर्वरीत 751 महसूली गावांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून आठ सवलती लागू करण्यास शासनाने मंजूरी दिली आहे.
त्यानुसार आर्णि तालुक्यातील 106 गावे, दिग्रस तालुक्यातील 81 गावे, नेर तालुक्यातील 82, पुसद तालुक्यातील 142, घाटंजी तालुक्यातील 66, वणी तालुक्यातील 157 आणि झरीजामणी तालुक्यातील 117 गावांमध्ये दुष्काळसदृष्य परिस्थिती घोषित करून उपाययोजना लागू  करण्यात आल्या आहेत. या गावांमध्ये जमीन महसूलात सूट, सहकारी कर्जाचे पुनर्गठन, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थगिती, कृषी पंपाच्या चालू विजबिलात 33.5 टक्के सूट, शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी, रोहयो अंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथिलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर आणि टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतक-यांच्या शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे या आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत. सदर सवलती या गावांना त्वरीत उपलब्ध करून देण्यात याव्या, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी