अवैध रेती उत्खनन करणा-यांवर धडक कारवाई


जिल्हा प्रशासनाने केला 11 लाखांचा दंड वसूल
* विशेष पथकाद्वारे होणार कारवाई
यवतमाळ, दि. 28 : रेती घाटांवर उत्खननाची परवानगी नसतांना अवैधरित्या रेती उत्खनन
करणा-यांवर जिल्हा प्रशासनाने विशेष पथकाद्वारे कारवाई करून 11 लाखांचा दंड वसूल केला आहे. ही कारवाई दि. 27 फेब्रुवारी रोजी रात्रीच्या दरम्यान करण्यात आली.
            जिल्ह्यातील सर्व उपविभाग व तहसील कार्यालयांतर्गत असलेल्या रेती घाटांचा लिलाव झालेला नसतांनासुध्दा अवैधरित्या होणा-या रेती उत्खननास आळा बसण्याच्या दृष्टीने सात पथके तयार करण्यात आली. यात यवतमाळ, उमरखेड, पुसद, केळापूर, वणी आणि दारव्हा येथील उपविभागीय अधिकारी तर बाभुळगाव येथील तहसीलदार यांच्या नेतृत्वात पथकाने 11 प्रकरणात कारवाई करून 11 लक्ष 46 हजार 500 रुपयांचा दंड वसूल केला. यात आर्णि तालुक्यात सात प्रकरणे, महागाव तालुक्यात एक, घाटंजी तालुक्यात दोन तर राळेगाव तालुक्यातील एका प्रकरणाचा समावेश आहे. अवैध रित्या रेती उत्खनन करणा-या आर्णि येथील सात प्रकरणात एकूण 8 लक्ष 7 हजार 800 रुपयांचा दंड, महागाव येथील एका प्रकरणात 1 लक्ष 79 हजार, घाटंजी येथील दोन प्रकरणात 2 लक्ष 30 हजार 800 असा एकूण 11 लक्ष 46 हजार 500 रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे. तर राळेगाव येथील प्रकरणात दंडात्मक कार्यवाहिचा आदेश प्रलंबित आहे.
            सदर कारवाई बाभुळगाव तालुक्यात वाटखेड बु.१ (बेंबळा) घाटावर आणि वाटखेड खु.2 (बेंबळा) घाटावर, आर्णि तालुक्यात कवठा बा. १ (पैनगंगा), राणीधानोरा 1 (पैनगंगा), आणि राणीधानोरा 2 (पैनगंगा)घाटावर, उमरखेड तालुक्यात चिंचोलीसंगम १ (पैनगंगा), चिचोलीसंगम २ (पैनगंगा) आणि पळशी (पैनगंगा) घाटावर, महागाव तालुक्यात करजखेड १ (पुस), वाघनाथ १ (पुस), घाटंजी तालुक्यात उंदरणी (अडाण), किन्ही (अडाण), कु-हाड (अडाण), मारेगाव  तालुक्यात कोसारा, चनोडा आणि आपटी तर राळेगाव तालुक्यात रोहणी हिरापूर १, वा-हा २, झुल्लर, वा-हा १ या घाटांवर कारवाई करण्यात आली.
            जिल्ह्यात अवैधरित्या रेती उत्खनन करणा-या नागरिकांवर कडक कारवाई करण्याच्या सुचना जिल्हा प्रशासनाने संबंधितांना दिल्या असून ही धडक मोहीम निरंतर सुरू राहणार आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी