केंद्र व राज्य सरकारचे कृषी क्षेत्राला प्राधान्य – केंद्रीय गृहराज्यमंत्री अहीर





v पाच दिवसीय कृषी महोत्सवाचे उद्घाटन
यवतमाळ, दि. 27 : देशात शेतीवर अवलंबून असणा-या नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यामुळेच सरकारच्या प्रत्येक धोरणावर शेती क्षेत्राची छाप असते. शेतकरी हा केंद्रबिंदू मानून उत्पादन वाढीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. शासनाने नुकतीच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. या देशातील कृषी क्षेत्रालाच केंद्र आणि राज्य सरकारचे प्राधान्य आहे, असे प्रतिपादन केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केले.
पोस्टल ग्राऊंड येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) च्या वतीने जिल्हा कृषी महोत्सवाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी तर प्रमुख अतिथी म्हणून खासदार भावना गवळी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, कृषी विज्ञान केंद्राचे सहयोगी संशोधन संचालक डॉ. प्रमोद यादगीरवार, कार्यक्रम समन्वयक डॉ. सुरेश नेमाडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
येथील शेतकरी हा अभ्यासू व श्रम करणारा आहे, असे सांगून केंद्रीय गृह राज्यमंत्री अहीर म्हणाले, आयात थांबविण्यासाठी सरकारची पाऊले महत्वाची ठरली आहेत. आता देशाचे लक्ष निर्यातीकडे आहे. तूर डाळीच्या उत्पादनात यवतमाळ जिल्हा अव्वल ठरला आहे. साडेचार वर्षात सरकारने युरीयाचे भाव वाढू दिले नाही. चांगले बियाणे, चांगली खते शेतक-यांना उपलब्ध करून दिली. त्यामुळे शेतक-याचा लागत खर्च कमी झाला आहे, ही सरकारची उपलब्धी आहे. शासनाने विविध पिकांना हमीभाव जाहीर केले आहेत. शेतक-यांच्या उत्पादनाला भाव देऊन खरेदी वाढवली आहे. शेतक-यांसाठी सरकार प्रामाणिकपणे काम करीत आहे. जिल्ह्यात रब्बीचा हंगाम 87 हजार हेक्टरवरून दीड लक्ष हेक्टरवर गेला आहे. शेतीसोबतच जोडधंदा करणे आज काळाची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी बोलतांना किशोर तिवारी म्हणाले, कृषी महोत्सवाचे नियोजन उत्तम प्रकारे केले आहे. सर्व कृषी विभागाने यासाठी चांगली मेहनत घेतली असून या कृषी महोत्सवाचा लाभ शेतक-यांनी घ्यावा. आजच्या काळात सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. लागवडीवर खर्च कमी करण्याचे प्रयत्न सरकारने केले आहे. शेतीसाठी पतपुरवठा धोरण, पीक पध्दती या बाबी महत्वाच्या आहेत, असे त्यांनी सांगितले. खासदार भावना गवळी म्हणाल्या, शेतक-यांनी मनाशी ठरविले तर आपल्या जीवनात नक्कीच परिवर्तन घडू शकते, हे काही प्रगतशील शेतक-यांच्या सत्काराने निदर्शनास आले आहे. येथे झालेल्या शेतक-यांच्या सत्कारातून इतरांनी प्रेरणा घेऊन वाटचाल करावी. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतक-यांच्या खात्यात सहा हजार रुपयांची मदत मिळणार आहे, हा मोठा निर्णय सरकारने घेतला आहे, असेही त्या म्हणाल्या. तर शेतीविषयक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहचावे, हा कृषी महोत्सवाचा उद्देश आहे. शेती करण्याच्या पध्दतीमध्ये बदल करणे आवश्यक आहे. पाच दिवस चालणा-या या कृषी महोत्सवाचा शेतकरी आणि नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.
यावेळी 2016 चा वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रगतशील शेतकरी अरविंद बेंडे आणि उद्यानपंडीत पुरस्कार मिळाल्याबद्दल अशोक वानखेडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजनेच्या कार्डचे वितरण प्रातिनिधीक स्वरुपात विशाल चव्हाण, संतोष भुमार आणि दिनेश मेश्राम यांना तर प्रधानमंत्री श्रमजीवी योजनेचे वितरण संतोष तुंडलवार, सचिन टोणपे, विठ्ठल मालेकर यांना करण्यात आले.
तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते फित कापून कृषी महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विविध दालनाला मान्यवरांनी भेट दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर यांनी केले. संचालन विद्या चिंचोरे यांनी तर आभार उपसंचालक आर.एस. पाटील यांनी मानले. कार्यक्रमाला किशोर इंगळे, पं.स.उपसभापती संजय रेंगे, राजेंद्र डांगे, राजेश आडपवार, उपविभागीय कृषी अधिकारी डॉ. प्रशांत नाईक, कैलाश वानखेडे यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी