जिल्ह्यात बांधकाम कामगारांची नोंदणी 78 हजारांवर - पालकमंत्री मदन येरावार



v कामगारांना साहित्य कीटचे वाटप
यवतमाळ, दि. 18 : सन 2012 पासून बांधकाम कामगारांच्या योजना अस्तित्वात असल्या तरी त्यांची नोंदणी होत नव्हती. मात्र गत चार वर्षांत राज्य शासनाने बांधकाम कामागारांना योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रभागनिहाय, पंचायत समितीनिहाय नोंदणी करण्यासाठी पुढाकार घेतला. यवतमाळ जिल्ह्यातही या नोंदणीला कामगारांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिला. त्यामुळेच तीन हजारांवरून ही नोंदणी आता 78 हजारांवर पोहचली आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातर्फे नोंदणीकृत कामगारांना सुरक्षा व आवश्यक किटचे वाटप करतांना ते बोलत होते. यावेळी इंडो ऐलाईड कंपनीचे सौरभ जैन उपस्थित होते.
देश घडविण्याची क्षमता कामगारांमध्ये आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, शासनाने कामगारांच्या पाल्यांसाठी शिक्षण, वैद्यकीय सुविधा आदी योजना सुरू केल्या आहेत. तसेच कामगारांच्या मुलांसाठी कौशल्य प्रशिक्षण देण्यात येत आहे. पांढरकवडा येथील कार्यक्रमात पंतप्रधानांच्या हस्ते कौशल्य विकासाचे प्रमाणपत्र वाटप करण्यात आले आहे. कामगारांच्या सुरक्षिततेसाठी टॉर्च, हेल्मेट, पाण्याची बॉटल, जेवणाचा डब्बा, मच्छरदाणी, सेफ्टी शुज, हातमोजे आदी वस्तुंचा समावेश असलेली ही कीट अत्यंत उपयुक्त आहे. या किटचा वापर योग्य कामासाठी करा. ही कीट आपल्यासाठी, आपल्या सुरक्षिततेसाठी शासनाने दिली आहे. त्यामुळे किट वापरूनच कामगारांनी बांधकाम करावे. तसेच ही कीट किंवा यातील साहित्य विकले तर अशा कामगारांची नोंदणी रद्द केली जाईल. परिणामी कामगारांच्या योजनांपासून त्यांना वंचित व्हावे लागेल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.
यावेळी सारिका ताजणे, सुनंदा पारखी, सुनिता चौधरी, लालसिंह चव्हाण, दिलीप गोठे, दिलीप आडे आदींना पालकमंत्र्यांच्या हस्ते किटचे वाटप करण्यात आले.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी