विद्यार्थ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे - सामाजिक न्याय मंत्री बडोले





Ø  मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाचे लोकार्पण  
यवतमाळ, दि. 13 : सध्या स्पर्धेचे युग आहे. अनेक विद्यार्थी वसतीगृहात राहून शिक्षण घेत असतात. या विद्यार्थ्यांनी तक्रारी न करता शिक्षण घ्यावे. शिक्षणशिवाय तरणोपाय नाही, असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. हा मुलमंत्र विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवावा. तसेच आजच्या युगात नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करावे, असे आवाहन सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
राळेगाव येथे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांच्या शासकीय वसतीगृहाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आमदार डॉ. अशोक उईके, जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजन कोल्हे, भाविक भगत, प्रकाश भूमकाळे, पंचायत समिती सदस्य प्रशांत तायडे, सदाशिव महाजन, राजेंद्र डांगे, सामाजिक न्याय विभागाचे प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे, सहायक आयुक्त किशोर भोयर आदी उपस्थित होते.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, यापुढे वसतीगृहात नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर सर्व सुविधा उपलब्ध करून देऊ. सामाजिक न्याय विभागाच्या वतीने गेल्या साडेचार वर्षात अनेक वसतीगृह बांधण्यात आली आहेत. तर काही वसतीगृहांचे काम प्रगतीपथावर आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दाखविलेल्या मार्गावरूनच सामाजिक न्याय विभाग काम करीत असून शोषित वंचितांना न्याय मिळत आहे, असे ते म्हणाले.
यावेळी बोलतांना आमदार डॉ. अशोक उईके म्हणाले, वसतीगृह झाल्याने विद्यार्थ्यांच्या राहण्याचा प्रश्न निकाली निघाला आहे. येथे प्रशस्त इमारत उभी झाल्याने शहराच्या सौंदर्यात भर पडली आहे. विद्यार्थ्यांनी वसतिगृहातील ग्रंथालयात जास्तीत जास्त वेळ घालून बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी मुलींच्या वसतीगृहाची मागणी आमदार उईके यांनी केली.
यावेळी राजकुमार बडोले यांच्य हस्ते रमाई आवास योजना, मिनी ट्रॅक्टर योजना व कृषी स्वावलंबन योजनेच्या तसेच आदी योजनांच्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. तसेच पांढरकवडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता पी. एन. बुब व शाखा अभियंता नितीन राऊत यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.  
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार सहायक आयुक्त किशोर भोयर यांनी मानले. यावेळी राळेगाव येथील नगर पंचायतचे मुख्याधिकारी डॉ. विकास खंडारे, अनुसुचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष भाविक भगत, चित्तरंजन कोल्हे, पंचायत समिती सदस्या येनोकार, सदाशिव महाजन यांच्यासह विद्यार्थी, लाभार्थी, नागरिक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राळेगाव येथे बांधण्यात आलेल्या मागासवर्गीय मुलांच्या वसतीगृहात तळमजला व प्रथम माळा आहे. त्याचे एकूण बांधकाम 2466 चौ. मीटर आहे. या वसतीगृहात एकूण 28 खोल्या असून यात लायब्ररी हॉल, डायनिंग हॉल, इनडोर गेम्स रुम व कार्यालय यांचा समावेश आहे. सदर बांधकाम करण्यासाठी एकूण 4 कोटी 69 लक्ष रुपये खर्च आला आहे.
००००००          

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी