शासन, प्रशासन शेतक-यांच्या पाठिशी – जिल्हाधिकारी गुल्हाणे




v प्रधानमंत्री  किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ
v कार्यक्रम सुरू असतांनाच शेतक-याच्या खात्यात रक्कम जमा
यवतमाळ, दि. 24 : शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरू केली आहे. एक अतिशय चांगली योजना देशाच्या पंतप्रधानांनी घोषित केली असून या योजनेचा देशपातळीवर शुभारंभ होत आहे. या योजनेच्या माध्यमातून शेताक-यांना मदत करण्याचा उद्देश असून शासन आणि प्रशासन शेतक-यांच्या पाठिशी आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी जि.प.सदस्या रेणू शिंदे, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, तहसीलदार शैलेश काळे, कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. सुरेश नेमाडे, प्रगतशील शेतकरी बेंडे आदी उपस्थित होते.
अतिशय कमी कालावधीत जिल्ह्यात या योजनेची अंमलबजावणी करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, जिल्ह्यात शेतक-यांची माहिती गोळा करण्याचे चांगले काम झाले आहे. दोन हेक्टरपर्यंत जमीन असलेले शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. शेतक-यांना निश्चित उत्पन्न मिळण्यासाठी तीन टप्प्यात प्रत्येकी दोन हजार रुपये शेतक-यांच्या खात्यात जमा होणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबाबत नागरिकांनी इतरांनासुध्दा माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले. नुकत्याच आलेल्या शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील उर्वरीत 751 गावांत दुष्काळसदृष्य परिस्थिती जाहीर करून आठ सवलती लागू करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले.
यावेळी जिल्हाधिका-यांच्या हस्ते मडकोना येथील कैलाश ठेंगरी आणि मनोज उजवणे, शिवणी येथील संजय बोरकर आणि ताराचंद रामटेके, बोरजई येथील अनिल खरवडे या शेतक-यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी पंतप्रधान यांच्या ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमाचे तसेच गोरखपूर येथील प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या शुभारंभ कार्यक्रमाचे थेट प्रसारण दाखविण्यात आले.
उत्तर प्रदेशच्या गोरखपूर येथे देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशातील शेतक-यांच्या खात्यात रकमेचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. कार्यक्रम सुरू असतांनाच दारव्हा तालुक्यातील बोरी येथील अभिजित अशोक ठाकरे यांच्या खात्यात पहिला हप्ता जमा झाल्याचा मॅसेज त्यांच्या मोबाईलवर प्राप्त झाला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत संपूर्ण देशात शेतक-यांच्या एकूण 12 बॅचेस तयार करण्यात आल्या आहेत. पहिल्या बॅचमध्ये जिल्ह्यातील 10 हजार 666 शेतक-यांचा समावेश आहे.         
कार्यक्रमाचे संचालन कृषी विस्तार अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी