यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाणे रूजू



यवतमाळ, दि. 21 : यवतमाळचे जिल्हाधिकारी म्हणून अजय गुल्हाणे रुजू झाले असून त्यांनी आज (दि.21) आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांची बदली झाल्यामुळे वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी असलेले अजय गुल्हाणे यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
पदभार स्वीकारतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे म्हणाले, जिल्ह्यात पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेची प्रभावी अंमलबजावणी, संभाव्य पाणी टंचाईबाबत नियोजन, दुष्काळग्रस्त तालुक्यात मदत निधीचे वाटप तसेच आगामी निवडणुका मुक्त आणि नि:ष्पक्ष वातावरणात पार पाडणे, हे प्राधान्य आहे.
यावेळी जि.प.मुख्य कार्यकारी  अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) श्रीकांत देशपांडे, उपजिल्हाधिकारी (महसूल) अनुप खांडे, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) सविता चौधर, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, तहसीलदार शैलेश काळे आदी उपस्थित होते. 
जिल्हाधिकारी अजय गल्हाणे हे 2010 च्या बॅचचे आयएएस आहेत. मार्च 1994 ते जून 1996 या कालावधीत ते परिवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी, जून 1996 ते मे 1999 पर्यंत हिंगणघाटचे उपविभागीय अधिकारी, जून 1999 ते सप्टेंबर 2000 पर्यंत नागपूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (महसूल), ऑक्टोबर 2000 ते ऑगस्ट 2004 पर्यंत वर्धा येथे उपविभागीय अधिकारी, ऑगस्ट 2004 ते डिसेंबर 2005 पर्यंत नागपूर शहर दंडाधिकारी, डिसेंबर 2005 ते मे 2009 पर्यंत विशेष सुट्टीवर, जून 2009 ते जून 2012 पर्यंत नांदेड येथे अपर जिल्हाधिकारी, जून 2012 ते जून 2015 पर्यंत मुंबई येथे राजीव गांधी जीवनदायी योजनेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी, जुलै 2015 ते एप्रिल 2017 पर्यंत उर्जा, नवीन व नवकरणीय मंत्र्यांचे खाजगी सचिव, मे 2017 ते जानेवारी 2018 पर्यंत मुंबई येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहायक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि फेब्रुवारी 2018 ते 20 फेब्रुवारी 2019 पर्यंत वर्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी पदभार सांभाळला आहे. 
०००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी