डॉ. बाबासाहेबांच्या विचारांच्या स्थळांचा शासनाकडून विकास - सामाजिक न्यायमंत्री बडोले




Ø जेतवन हिवरी येथील विपश्यना केंद्राचा पायाभरणी समारंभ
      यवतमाळ, दि. 14 : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे आपल्यासाठी भूषण आहे. त्यांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी शासनाने अनेक योजना सुरू केल्या आहेत. तसेच डॉ. आंबेडकर हे ज्या ज्या ठिकाणी गेले अशा जवळपास 50 स्थळांचा शासनाकडून विकास करण्यात येत आहे, असे प्रतिपादन सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने हिवरी जेतवन येथे विपश्यना केंद्राच्या पायाभरणी समारंभात ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी विमल रामशिंग भन्तेजी अमेरिका, भिखूनी खंती खेमा -अमेरिका, आनन्द भन्तेजी औरंगाबाद, अस्वजित भन्तेजी, सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष रामुजी पवार उपस्थित होते.
जेतवन येथे विपश्यना केंद्राचा पायाभरणी करतांना आनंद होत आहे, असे सांगून सामाजिक न्यायमंत्री बडोले म्हणाले, 1920-22 च्या दरम्यान लंडन येथे स्कूल ऑफ इकोनॉमिक्समध्ये शिकत असतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर एनडब्लयू -३ या ठिकाणी वास्तव्यास होते. या घराचा लिलाव होत असल्याचे कळले. डॉ. आंबेडकरांचा वारसा आपण जपला पाहिजे, या उद्देशाने ते घर राज्य शासनाने घेतले. बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी अनेक योजना सुरू आहे. गत तीन वर्षात या माध्यमातून राज्यातील 97 विद्यार्थी जगातील पहिल्या शंभर विद्यापीठांत शिकत आहेत. गत साडेचार वर्षात अनेक कामे करण्याचा प्रयत्न केला.
तथागत भगवान बुध्दाबाबत बोलतांना ना. बडोले म्हणाले, बुध्दाचा मार्ग आणि बुध्दाचा धम्म सर्वत्र आहे. बुध्दाने सांगितलेल्या दहा पारमिता आणि पंचशीलाचा मार्ग अवलंब करणे गरजेचे आहे. बुध्दाचा धम्म वाढला पाहिजे. बुध्द हे शांती, प्रज्ञा आणि शिलेचे प्रतिक असल्यामुळे जगातील सर्व विद्वानांच्या दिवाणखान्यात बुध्दाची प्रतिमा ठेवली जाते, असेही त्यांनी सांगितले. जेतवनच्या विकासासाठी 2 कोटी रुपये देण्यात आले आहे. या स्थळाच्या विकासासाठी अधिक निधी देण्यास राज्य शासन कटिबध्द आहे, असेही ते म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रादेशिक उपायुक्त विजय साळवे यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार साहाय्यक आयुक्त किशोर भोयर  यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने नागरीक उपस्थित होते.
सामाजिक न्याय मंत्र्यांच्या हस्ते आर्णि येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृहाचे लोकार्पणसुध्दा करण्यात आले. यावेळी आमदार राजू तोडसाम उपस्थित होते.
००००००००





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी