मतदारांना मतदानासाठी 11 कागदपत्रांचा पर्याय



      यवतमाळ, दि. 16 :  मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त आता 11 प्रकारच्या कागदपत्रांचा पर्याय मतदाराला देण्यात आला आहे. मतदान करण्यासाठी मतदाराकडे या अकरा कागदपत्रांपैकी एक कागदपत्र असल्यास पुरावा म्हणून तो ग्राह्य धरण्यात येईल.
            आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदान करतांना केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी जे नागरिक मतदार ओळखपत्र सादर करू शकत नाही, अशा मतदारांनी ग्राह्य अकरापैकी एक ओळखपत्र सादर केले तरी त्या मतदाराला मतदानाचा हक्क बजावता येणार आहे. निवडणूक आयोगाने या कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहन चालक परवाना (ड्रायव्हिंग लायसंन्स), केंद्र / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / सार्वजनिक मर्या. कंपनीचे सर्व्हीस ओळखपत्र, बँक / पोस्टाद्वारे वितरीत छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडीया यांच्याद्वारे नॅशनल पाप्युलेशन रजिस्टर अंतर्गत दिलेले स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉब कार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजनेंतर्गत निर्गमित आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र, खासदार / आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड यांचा समावेश केला आहे.
            छायाचित्रासह मतदार ओळखपत्रान्वये मतदाराची ओळख पटत असेल तर मतदार ओळखपत्रातील किरकोळ विसंगती दुर्लक्षित करण्यात याव्या, अशा आयोगाच्या सुचना आहे. मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिका-यांनी वितरीत केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारण्यात यावे. मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटणे / पटविणे शक्य नसल्यास मतदारास वर नमुद अकरा पर्यायी कागदपत्रांपैकी एक ओळखपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रशासनाच्या वतीने मतदारांना मोठ्या प्रमाणावर छायाचित्रासह मतदार ओळखपत्र वाटप करण्यात आले आहे. तसेच जवळपास प्रत्येकाकडे आधार कार्ड आहे. त्यामुळे भारत निवडणूक आयोगाने आता छायाचित्रासह मतदार चिठ्ठी (फोटो व्होटर्स स्लीप) ओळख कागदपत्र म्हणून ग्राह्य धरण्यात येणार नाही, असा निर्णय घेतला आहे. केवळ छायाचित्रासह मतदार चिठ्ठी ही आपली ओळख पटविण्यासाठी मतदार केंद्रावर स्वीकरण्यात येणार नाही. त्यामुळे मतदारांनी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र किंवा निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त कागदपत्रापैकी एक ओळख कागदपत्र सोबत आणावे. प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही निवडणूक विभागाने कळविले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी