उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर विविध पथकांचा ‘वॉच’



v खर्च नियंत्रण पथकाद्वारे नोंदवही व बँक व्यवहारांची नियमित तपासणी
यवतमाळ, दि. 12 : निवडणुकांमध्ये उमेदवारांकडून होणारा प्रचार आणि त्यासाठी येणारा खर्च हा आदर्श आचारसंहितेच्या नियमात असावा, यासाठी निवडणूक आयोगाने मर्यादा घालून दिली आहे. विधानसभा निवडणुकीत प्रत्येक उमदेवाराची खर्चाची मर्यादा 28 लक्ष रुपये आहे. या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक विधानसभा मतदारसंघात खर्च तपासणी पथक स्थापन करण्यात आले आहे. विविध पथके आणि खर्च तपासणी पथकाचा उमेदवारांच्या खर्चावर नियमित ‘वॉच’ असल्यामुळे उमेदवारांना कुठलाही खर्च लपविता येत नाही.
प्रत्येक विधानसभा मतदार संघात उमेदवारांकडून होणारा खर्च प्रत्यक्ष फिल्डवर तपासून त्याची पडताळणी करण्यासाठी चार विशेष पथकांचे गठण करण्यात आले आहे. यात फ्लाईंग स्कॉड, व्हीडीओ पाहणी पथक, व्हीडीओ सर्व्हेक्षण टीम आणि स्थिर सर्वेक्षण पथकाचा समावेश आहे. यवतमाळ विधानसभा मतदारसंघात 4 फ्लाईंग स्कॉड (1 पथकप्रमुख, 1 व्हीडीओग्राफर, पोलिस अधिका-यासह इतर दोन कर्मचारी), 3 व्हीडीओ पाहणी पथक (1 अधिकारी व 2 कर्मचारी), 3 व्हीडीओ सर्व्हेक्षण पथक (1 अधिकारी व 1 कर्मचारी) आणि 5 स्थिर सर्व्हेक्षण पथक (1 पथक प्रमुख, व्हीडीओग्राफर आणि पोलिस अधिकारी व दोन कर्मचारी) स्थापन करण्यात आले आहे. स्थिर सर्व्हेक्षण पथक हे यवतमाळ विधानसभा क्षेत्रात नागपूर रोड, पांढरकवडा रोड, मनदेव, पांढरी आणि तिवसा येथे तैनात ठेवण्यात आले आहे. अशाच पथकांची रचना जिल्ह्यातील इतरही विधानसभा मतदारसंघात करण्यात आली आहे.
ही पथके उमेदवारांच्या खर्चावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. खर्चाचा अहवाल खर्च तपासणी पथकाकडे सादर केल्यानंतर उमेदवाराने सादर केलेला खर्च आणि विविध पथकाच्या माध्यमातून देण्यात आलेला खर्च याची शहानिशा करण्यात येते. तसेच उमेदवारांच्या खर्चाची नोंदवही आणि त्यांच्या बँकेच्या व्यवहारांवर खर्च तपासणी पथकाचे लक्ष असते. निवडणुकीसाठी असलेल्या उमदेवारांच्या अधिकृत बचत खात्यातून झालेले रोजचे व्यवहार तपासण्यात येत आहे.  निवडणूक खर्चाकरीता उमेदवाराचे स्वतंत्र बँक खाते आवश्यक आहे. याच बँक खात्यातून निवडणुकीसाठी खर्च करायचा असून 10 हजार रुपयांपर्यंत रोखीने व्यवहार करता येतात. तर दहा हजारांवरील निवडणूक खर्च रेखांकित धनादेशाद्वारे करणे बंधनकारक आहे.
उमेदवाराचा निवडणूक खर्च हा नामनिर्देशन पत्र भरण्याच्या दिनांकापासून मतमोजणीच्या दिनांकापर्यंत गृहीत धरण्यात येतो. त्यासाठी उमेदवारांच्या निवडणूक प्रतिनिधींनी दर दिवशी झालेला खर्च दुस-या दिवशी दुपारी 2 वाजेपर्यंत विहित नमुन्यात संबंधित विधानसभा मतदार संघातील खर्च तपासणी पथकाकडे सादर करणे बंधनकारक आहे. यासाठी उमेदवाराला किंवा त्यांच्या खर्च विषयक बाब पाहणा-या प्रतिनिधीला तीन रजिस्टर देण्यात आले आहेत. यात दैनंदिन खर्चाची नोंदवही, रोकड नोंदवही आणि बँक नोंदवही याचा समावेश आहे. उमेदवारांच्या या रजिस्टरची केंद्रीय खर्च निरीक्षकांकडून संपूर्ण कालावधीत किमान तीन वेळा तपासणी करण्यात येते. यापैकी काही मतदारसंघात पहिली खर्च तपासणी करण्यात आली आहे.
प्रत्येक उमेदवारांच्या निवडणूक खर्चाचा अहवाल निकालानंतर 30 दिवसांच्या आत खर्च तपासणी पथकाकडे सादर करणे आवश्यक आहे. उमेदवाराने खर्चाचा अहवाल विहित नमुन्यात तसेच विहित मुदतीत सादर न केल्यास लोकप्रतिनिधी कायदा 1951 च्या कलम 10 ए नुसार उमेदवाराला अपात्र ठरविण्याची तरतूद आहे. याशिवाय खर्च सनियंत्रण कक्षाकडे शॅडो आब्जर्व्हेशन रजिस्टर असून सी-व्हीजील ॲप, निवडणूक कॉल सेंटर व विविध ॲपवर खर्चाबाबत येणा-या तक्रारींची शहानिशा उमेदवारांनी दिलेल्या खर्चासोबत करण्यात येते. यात तफावत आढळल्यास 24 तासांच्या आत उमेदवाराला नोटीस देण्याचे प्रस्तावित आहे. खर्च तपासणी पथकाच्यावतीने विविध बाबींची दरसूची तयार करण्यात आली असून ही दरसुची उमेदवाराला देण्यात आली आहे.
०००००००





Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी