नागरिकांनो प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प करा – जिल्हाधिकारी गुल्हाने








v प्लास्टिक मुक्त भारत अभियान मोहीम
यवतमाळ, दि. 02 : प्लास्टिक हे मानवी जीवनसाठी तसेच पर्यावरणासाठी अतिशय घातक आहे. प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरणाचा –हास होऊन अनेक घातक रोगांची निर्मिती होत आहे.  आपल्या भविष्याचा विचार करून निरोगी आणि सृदृढ राहायचे असेल तर आतापासूनच प्लास्टिक न वापरण्याचा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी नागरिकांना केले.
पोस्टल ग्राऊंड येथे नगर पालिका व जिल्हा प्रशासनाच्या वतीने स्वच्छता ही सेवा अंतर्गत प्लास्टिक मुक्त भारत अभियानाचा शुभारंभ करतांना ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, जिल्हा पुरवठा अधिकारी शालीग्राम भराडी, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक डॉ. रंजनकुमार वानखेडे आदी आदी उपस्थित होते.
राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पाच वर्षांपूर्वी स्वच्छ भारत मिशन ही लोकचळवळ झाली. स्वच्छतेबाबत नागरिक जागरुक होत आहे. प्लास्टिकला आपल्या जीवनातून हद्दपार करणे गरजेचे आहे. त्यामुळे त्याचे संकलन करून प्लास्टिक नष्ट करा.आपले घर, परिसर, गाव, शहर, राज्य आणि देश येथे आपण प्लास्टिकचा वापर करणार नाही, असा संकल्प करा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी प्लास्टिक मुक्ती आणि तंबाखू निर्मुलनासंदर्भात उपस्थितांना शपथ दिली. तसेच हिरवी झेंडी दाखून रॅलीला रवाना केले. यावेळी जिल्हाधिका-यांसह सर्व अधिका-यांनी परिसरातील प्लास्टिक आणि कचरा गोळा केला.
तत्पूर्वी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले समाजकार्य विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी कलापथकाद्वारे प्लास्टिक निर्मुलनाबाबत सादरीकरण केले. तसेच यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे प्रा. कमल राठोड यांनी प्लास्टिकच्या दुष्परिणामाबाबत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी तर संचालन डॉ. विजय अग्रवाल यांनी केले. या कार्यक्रमात न.प.उच्च प्राथमिक उर्दु शाळा, लोकनायक बापुजी अणे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ॲग्लो हिंदी हायस्कूल, रोटरी क्लब, अमोलकचंद विधी महाविद्यालय, इंडियन मेडीकल असोसिऐशन, निमा, हिरो होंडा व्यवस्थापन, नेहरू युवा केंद्र, चेंबर ऑफ कॉमर्स, लायन्स क्लब, लायनेस क्लब, दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालय, चिल्लर किराणा व्यापारी संघटना, महिला आर्थिक विकास महामंडळाचे महिला बचत गट, राष्ट्रीय सेवा योजना, एनसीसी, सर्व शाळांचे विद्यार्थी तसेच विविध शासकीय विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी