जिल्हाधिका-यांनी केली नुकसानग्रस्त पिकांची पाहणी





v सुकळी, लोणबेहळ, कोसदनी, साकूर येथे भेट
यवतमाळ, दि. 30 : अवकाळी पावसाचा फटका संपूर्ण राज्यासह जिल्ह्यालासुध्दा बसला आहे. या पावसामुळे मोठ्या प्रमाणात सोयाबीन आणि कापसाचे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केली. आर्णी तालुक्यातील सुकळी, लोणबेहळ, कोसदनी आणि साकूर येथील शेतक-यांच्या शेतावर जाऊन जिल्हाधिका-यांनी नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली.
सुकळी येथील शेतकरी रामभाऊ मोरे, साकूर येथील प्रतिभा ठाकरे आणि लोणबेहळ येथील ज्ञानेश्वर टाले यांच्या शेतावर जिल्हाधिका-यांनी भेट दिली असता, शेतमालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संपूर्ण तालुक्यालाच अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे महसूल आणि कृषी विभागाने संयुक्तपणे सर्व्हे करून शेतक-यांना त्वरीत नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतक-यांनी जिल्हाधिका-यांकडे केली.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत येणा-या तसेच याव्यतिरिक्त ज्या पिकांचे नुकसान झाले आहे, या सर्वांचाच विचार करून संयुक्तपणे सर्व्हेक्षण करण्यात येईल. कृषी, ग्रामविकास आणि महसूल यंत्रणेच्या माध्यमातून तातडीने सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, आर्णीचे तहसीलदार धीरज स्थूल, तालुका कृषी अधिकारी आर.एन.पसलवाड, लोणबेहळचे मंडळ अधिकारी यू.एस. मनवर, विमा कंपनीचे प्रतिनिधी रवी जाधव यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
प्राथमिक अंदाजानुसार अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात जवळपास 1 लक्ष 5 हजार हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. शेतक-यांनी नुकसानीचे अर्ज कृषी सहाय्यक, तलाठी, कृषी पर्यवेक्षक, तालुका कृषी अधिकारी, विमा कंपनीचे तालुका प्रतिनिधी यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. आर्णी तालुक्यात एकूण 7247 हेक्टर क्षेत्र बाधीत झाले आहे. यात 5690 हेक्टरवरील सोयाबीन आणि 1557 हेक्टरवरील कापसाचा समावेश आहे. तालुक्यातील सर्व 105 गावांना पावसाचा फटका बसला असून बाधीत शेतक-यांची संख्या 2700 आहे. पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत नोंदणी केलेल्या शेतक-यांचे नुकसानीचे अर्ज स्वीकारणे सुरू असल्याची माहिती तहसीलदार धीरज स्थूल यांनी दिली.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी