प्लॅस्टिक निर्मुलनासाठी सर्वांनी सहकार्य करावे – जिल्हाधिकारी


                                                              
यवतमाळ, दि. 01 : प्लॅस्टिकच्या अनिर्बंध वापरामुळे पर्यावरण तसेच मानवी जीवाला धोका निर्माण होत आहे. यावर मात करण्यासाठी प्लॅस्टिक मुक्तीकडे एक पाऊल टाकायचे आहे. याची सुरवात महात्मा गांधी जयंतीनिमित्त जिल्ह्यात प्लॅस्टिक निर्मुलन जनजागृती कार्यक्रमाने होणार आहे. या मोहिमेत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्लॅस्टिक मुक्ती मोहिमेसंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, डॉ. विजय अग्रवाल आदी उपस्थित होते.
2 ऑक्टोबरपासून सुरू होणा-या या मोहिमेंतर्गत आपला परिसर, घर, कार्यालय आदी ठिकाणचे प्लॅस्टिक गोळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरीता कारखान्यात पाठविण्यात येणार आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, आपल्या आरोग्याशी तसेच पर्यावरणाच्या संरक्षणासाठी असलेल्या या मोहिमेत सर्व नागरिक, सामाजिक संघटना, व्यापारी संघटना, विद्यार्थी आदींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे. पोस्टल ग्राऊंड येथून सुरू होणा-या या मोहिमेत प्रशासनाचे सर्व अधिकारी उपस्थित राहतील. शहरात सात ठिकाणी प्लॅस्टिक संकलन केंद्र सुरू करण्यात आले असून हे प्लॅस्टिक पुनर्रचक्रीकरण करण्यासाठी कारखान्यात पाठविण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
या मोहिमेंतर्गत प्लॅस्टिक निर्मुलन आणि स्वच्छतेसंदर्भात पथनाट्य सादर करण्यात येईल. तसेच गोळा झालेले प्लॅस्टिक चंद्रपूर येथील अंबुजा सिमेंट येथे पाठविण्यात येणार आहे. पोस्टल ग्राऊंडवरून सकाळी 8 वाजता रॅलीचे आयोजन असून जिल्हाधिका-यांच्या हस्ते येथे शपथ देण्यात येईल. त्यानंतर सदर रॅली स्टेट बँक चौक, बस स्टँड, आर्णि रोड, हनुमान आखाडा, मेन लाईन यामार्गाने जाणार आहे. ‘नो टू सिंगल युज प्लॅस्टिक’ असा जागर या रॅलीतून करण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा यांनी सांगितले.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी