मतदार जनजागृतीसाठी कलेक्टर एसपी सायकलवर






* इतरही अधिका-यांचा रॅलीत सहभाग
यवतमाळ दि. 11 : निवडणुकीच्या कामात संपूर्ण प्रशासनासह पोलिस प्रशासनसुध्दा जोमाने कामाला लागले आहे. जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघाचा व्याप, निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार विविध कामे, कायदा व सुव्यवस्था आदींबाबत सर्व अधिकारी सतत व्यस्त असतात. मात्र असे असले तरी मतदानाची टक्केवारी वाढविणे ही जबाबदारीसुध्दा पार पाडायची आहे. याचीच जाणीव ठेवून नागरिकांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हाधिकारी, पोलिस अधिक्षक यांच्यासह इतर अधिका-यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदविला. 
आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे, यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने 11, 12 आणि 13 ऑक्टोबर या तीन दिवसात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील मुख्य रस्ते तसेच नागरी वसाहतींमध्ये प्रत्येक दारापर्यंत मतदानाचा जागर पोहोचवावा, या उद्देशाने पोस्टल ग्राऊंड येथून सायकल रॅलीला सुरवात झाली. यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी अधिका-यांनी सायकल रॅलीत सहभाग नोंदवून मतदान जनजागृतीचा संदेश दिला.
यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, येत्या 21 ऑक्टोबर रोजी होणा-या मतदानात जिल्ह्यातील 100 टक्के मतदारांनी सहभाग घ्यावा. निवडणुका या लोकशाहीचा प्राण आहे. मतदान करणे हे केवळ राष्ट्रीय कर्तव्य नसून संविधानाने आपल्याला दिलेला एक अधिकारसुध्दा आहे. 21 ऑक्टोबरपर्यंत आपण सर्वांनी आपले कुटुंबीय, नातेवाईक, परिसरातील इतर नागरिक, मित्र-मैत्रीणी या सर्वांना मतदान करण्याबाबत जनजागृती करावी, असे आवाहन त्यांनी केले.
तत्पूर्वी पोस्टल ग्राऊंड येथे नायब तहसीलदार (निवडणूक) रुपाली बेहरे यांनी रॅलीला हिरवी झेंडी दाखवून रवाना केले. सदर सायकल रॅली पोस्टल ग्राऊंड, पोस्ट ऑफिस, स्टेट बँक चौक, अप्सरा टॉकीज, हनुमान आखाडा, शहर पोलिस स्टेशन, तहसील चौक, गोधणी रोड, अँग्लो इंडियन हायस्कूल, माईंदे चौक, वीरवामन चौक, दाते कॉलेज, आर्णि रोड, समर्थ हॉस्पीटल, वडगाव नाका, दर्डा नगर, पाण्याची टाकी, दारव्हा रोडवरून पोलिस मुख्यालयात आल्यानंतर तेथे समारोप करण्यात आला.
यावेळी उपजिल्हाधिकारी शैलेश काळे, पालिका प्रशासन अधिकारी शशीमोहन नंदा, डॉ. विजय अग्रवाल यांच्यासह रोटरी क्लब, इंडियन मेडीकल असोसिएशन, सायकल असोसिएशन, गो ग्रीन संस्था, निमा, इंडियन होमिओपॅथिक असोसिएशन, यवतमाळ सायकल क्लब यांच्यासह इतर संघटनेच्या प्रतिनिधींनी सायकल रॅलीत सहभाग घेतला.

मतदार जनजागृतीसाठी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसोबत बैठक
कामगार व औद्योगिक क्षेत्रातील विविध आस्थापनेवर काम करणा-या नागरिकांपर्यंत मतदानाबाबत जनजागृती व्हावी, या उद्देशाने जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींसोबत जिल्हधिकारी कार्यालयात बैठक घेतली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा उपस्थित होते.
          जिल्ह्यातील लहान-मोठे उद्योजक, व्यापारी तसेच चेंबर ऑफ कॉमर्सच्या प्रतिनिधींनी मतदान जनजागृती प्रक्रियेत सहभाग नोंदवावा. आपल्या आस्थापनेवरील जास्तीत जास्त मतदार मतदानाचा हक्क बजावतील,

याबाबत त्यांना मार्गदर्शन करावे. तसेच पोस्टर्स, बॅनर, एसएमएस, व्हॉट्सॲप आदींच्या माध्यमातून मतदानाचा संदेश नागरिकांपर्यंत पोहचवावा, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले.
          यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष अरुण पोबारु, उपाध्यक्ष राजेंद्र निमोदिया, मधुसूदन मुंदडा, रघुनाथ कापर्तीवार, सराफा असोसिएशनचे सारंग भालेराव, रत्नाकर पचगडे यांच्यासह यवतमाळ जिल्हा पेट्रोलियम असोसिएशन, कॉम्प्युटर असोसिएशन, कृषी संघटना, किराणा असोसिएशन आदी संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.  

   
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी