स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळेअंतर्गत अधिका-यांनी दिले विद्यार्थ्यांना धडे




यवतमाळ, दि. 05 : यवतमाळ शहरामध्ये नव्याने निर्माण झालेल्या डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यास केंद्रात जिल्हा प्रशासन व जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्पर्धा परिक्षा मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने तर मुख्य मार्गदर्शक म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अप्पर पोलीस अधीक्षक नुरुल हसन, निवासी जिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी नितीन सोनोने उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, ध्येय निश्चित असेल तसेच मेहनत व अभ्यासामध्ये सातत्य असेल तर स्पर्धा परिक्षांमध्ये यश संपादन करता येते. आहे त्या साधनांचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी अभ्यास केंद्राचासुध्दा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. नुरुल हसन म्हणाले की, मी एका सामान्य कुटूंबातून आलो आहे. प्राथमिक शिक्षण खेडे गावातील जि.प.शाळेतून झाले. परंतु जिद्द असेल, मेहनत करण्याची तयारी असेल तर आपणही यश संपादन करू शकतो, असे त्यांनी सांगितले. जलज शर्मा मार्गदर्शन करतांना म्हणाले, स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी व्हॉटस् ॲप, फेसबुक अशा सोशल मिडीया पासून स्वत: दूर ठेवावे. तसेच युपीएससी चा अभ्यास करतांना 10 वर्षाच्या प्रश्नपत्रीकेमधील अभ्यास केला तर आपणास त्याचा चांगला लाभ मिळेल. निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार वऱ्हाडे यांनी एमपीएससी परीक्षाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यश संपादन करण्यासाठी कोणताही शॉर्टकट नसतो तर दररोज अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच आपणास यश मिळेल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक व संचालन ललितकुमार वऱ्हाडे यांनी केले. यावेळी कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लिकर, उपअभियंता प्रविण कुळकर्णी, जिल्हा ग्रंथालय येथील व महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. शेवटी प्रश्नोत्तरांचा तास झाला यामध्ये विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे उपस्थित मान्यवरांनी दिली.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी