निवडणुकीच्या व्यस्ततेतून खर्च निरीक्षकांचे ‘व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम’ बाबत व्याख्यान




v वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले मार्गदर्शन
      यवतमाळ, दि. 18 : जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून बाहेरच्या राज्यातील निरीक्षकांची नियुक्ती केली जाते. प्रशासनातर्फे करण्यात येणा-या निवडणुकीच्या कामावर त्यांचे बारकाईने लक्ष असते. याशिवाय मतदारसंघात दौरे, विविध बैठका, खर्चाचा आढावा, नागरिकांच्या तक्रारी आदी कामांमुळे निरीक्षकसुध्दा व्यस्त असतात. मात्र या व्यस्ततेतून थोडा वेळ काढून खर्च निरीक्षक ए. व्यंकदेश बाबु यांनी व्यसनाधिनतेच्या दुष्परिणामाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
            जिल्ह्यातील 81 – पुसद आणि 82 – उमरखेड विधानसभा मतदारसंघासाठी ए. व्यंकदेश बाबु यांची खर्च निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 2014 ते 2017 या कालावधीत त्यांनी चेन्नई येथील सेंट्रल ब्युरो ऑफ नारकोटिक्सच्या गुप्तवार्ता सेलचे प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. या कालावधीत त्यांनी अरुणाचल प्रदेशची चीन आणि म्यानमारला लागून असलेल्या सीमेवरील घनदाट जंगलातील नशीले पदार्थांच्या झाडांचे उत्पादन पूर्णपणे नष्ट केले होते. त्यांच्या या अनुभवाचा व अंमली पदार्थाबाबत असलेला अभ्यास इतरांना माहिती व्हावा या उद्देशाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ‘अंमली पदार्थाचे सेवन आणि व्यसनाधिनतेचे दुष्परिणाम’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते.
यावेळी त्यांनी व्यसन व अंमली पदार्थाचे दुष्परिणाम तसेच याबाबत असणारे कायदे यावर प्रकाश टाकला. व्यसनमुक्त समाज निर्मितीच्या दृष्टीने त्यांनी विद्यार्थ्यांना अवगत केले. वेगवेगळ्या अंमली पदार्थाचे शरीरावर, मनावर व समाजावर होणारे दुष्परिणाम, अंमली पदार्थ हाताळतांना असणारी जोखीम व कायदेशीर बाबी त्यांनी समजावून सांगितल्या. यावेळी त्यांनी पावर पॉईंट प्रेजेंटेशन केले. प्रश्नोत्तराच्या तासानंतर अंमली पदार्थ सेवन न करण्याची व याबाबत प्रसार करण्याची शपथ उपस्थितांना दिली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यायाचे अधिष्ठाता डॉ. मनिष श्रीगिरीवार यांच्या मार्गदर्शनात नेत्रचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुधीर पेंडके, संपर्क प्रमुख चंद्रकांत कारीया, प्रकाश येनकर, विशाल मस्के यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. डॉ. शिवानी माहुरे यांनी उपस्थितांचे आभार मानले.


पुसद आणि उमरखेड विधानसभा मतदारसंघाचे खर्च निरीक्षक असलेले ए. व्यंकदेश बाबु हे नारकोटिक्स विभागापूर्वी 2011 ते 2014 या कालावधीत सक्तवसुली संचालनालयामध्ये (ईडी) सहाय्यक संचालक म्हणून कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक प्रतिष्ठीत हवालाची प्रकरणे हाताळली. शैक्षणिक तसेच सामाजिक कार्याची तळमळ असलेल्या ए. व्यंकदेश बाबु यांनी अंमली पदार्थाबाबत देश-विदेशात व्याख्याने दिली आहेत. व्यसनमुक्त भारत करण्याच्या उद्देशाने ते तरुणांमध्ये व्यसनाधिनतेबाबत जनजागृती करीत असतात. आतापर्यंत 130 महाविद्यालयांमध्ये तसेच तामिळनाडू आणि पुद्दुचेरीचे पोलिस प्रशिक्षण केंद्र, भारतीय  नौसेना आणि भारतीय तटरक्षक दलामध्ये सुध्दा त्यांनी अंमली पदार्थाबाबत व्याख्यान दिले आहे. अंमली पदार्थाबाबत सर्वात मोठी जनजागृती मोहीम राबविल्याबद्दल त्यांचे ‘ग्रीनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नाव आहे.

००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी