मतदानाचा दिवस व पूर्वीच्या दिवशी वृत्तपत्रातील राजकीय जाहिराती पूर्वप्रमाणित करून घेणे बंधनकारक



यवतमाळ, दि. 16 : मतदानाच्या दिवशी तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी वृत्तपत्रात प्रसिद्ध करावयाच्या राजकीय जाहिराती माध्यम प्रमाणीकरण आणि सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करून घेणे बंधनकारक असल्याचे भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे. दिनांक 20 व 21 ऑक्टोबर 2019 रोजी प्रकाशित होणा-या राजकीय जाहिरातींच्या प्रमाणीकरणासाठी जिल्हा माहिती कार्यालय, दगडी इमारत, तहसील चौक, यवतमाळ येथील माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समितीकडे संपर्क साधावा, असे आवाहन निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.
अफवा पसरवणाऱ्या आणि आक्षेपार्ह स्वरुपाच्या राजकीय जाहिराती मतदानाच्या दिवशी व त्या अगोदरच्या दिवशी प्रसिद्ध झाल्यास पूर्ण निवडणूक प्रक्रियेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. असे प्रकार यापूर्वी झाल्याचे आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे. अशा जाहिराती प्रसिद्ध झाल्यास प्रतिपक्षाच्या उमेदवाराला स्पष्टीकरणाची संधीच मिळत नसून त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे अन्याय होऊ शकतो. या बाबींना आळा घालण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने संविधानाच्या कलम 324 नुसार आदेश काढले आहेत. त्यानुसार कोणताही राजकीय पक्ष, उमेदवार, संघटना किंवा व्यक्तीला मतदानाचा दिवस (21 ऑक्टोबर)  तसेच त्याच्या अगोदरच्या दिवशी (20 ऑक्टोबर) प्रसिद्ध करावयाच्या जाहिराती नियमानुसार जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय माध्यम प्रमाणीकरण व सनियंत्रण समिती (एमसीएमसी) कडून प्रमाणित करून घेतल्याशिवाय प्रसिद्ध करता येणार नाही, याची सर्व उमेदवारांनी नोंद घवी, असे कळविण्यात आले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी