शहराच्या विकासात लोकांचे सहकार्य महत्वाचे – जिल्हाधिकारी गुल्हाने



v  घनकचरा व्यवस्थापन व जलपुनर्भरणबाबत कार्यशाळा
v  जिल्ह्यातील नगराध्यक्ष व नगरसेवकांची उपस्थिती
यवतमाळ, दि. 3 : घनकचरा व्यवस्थापन हे नागरिकांच्या आरोग्याशी तर जलपुनर्भरण हे पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे. स्वच्छता, आरोग्य, शिक्षण, पिण्याचे पाणी या मुलभूत गरजा व सुविधा नागरिकांना मिळाल्या पाहिजे. त्यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक या सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात नगर पालिका प्रशासन आणि प्रयास संस्थेच्या वतीने आयोजित घनकचरा व्यवस्थापन व जलपुनर्भरणाबाबत कार्यशाळेत ते बोलत होते. यावेळी मंचावर नगराध्यक्षा कांचन चौधरी, पालिका प्रशासन  अधिकारी शशीमोहन नंदा, मुख्याधिकारी अनिल अढागळे आदी उपस्थित होते.
लोकांना सुविधा पुरविणारे शहर म्हणून आपली ओळख निर्माण झाली पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पालिका प्रशासनाच्या तसेच नगरसेवकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सर्वांच्या सहकार्याने सोडविल्या जातील. त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे नेहमी सहकार्य राहील. अडचणी आल्या तरी त्यातून मार्ग काढणे शक्य आहे. भविष्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाच्या वतीने रेन वॉटर हार्वेस्टिंगचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. यासाठी वॉर्डावॉर्डात जनजागृती करण्यात येत आहे. नगरसेवक – नगरसेविकांनीसुध्दा रेन वॉटर हार्वेस्टिंगचे महत्व नागरिकांना पटवून द्यावे. घनकचरा व्यवस्थापन आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग हे दोन्ही प्रकल्प नियमितपणे सुरू राहतील. सर्व पालिकांच्या  मुख्याधिका-यांना तशा सुचना देण्यात आल्या आहेत, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते सर्व नगरपालिकांच्या लोकप्रतिनिधींची माहिती असलेल्या पुस्तिकेचे विमोचन करण्यात आले. रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल डॉ. चेतन दरणे यांनी तर ड्रेन वॉटर हार्वेस्टिंगबद्दल डॉ. अविनाश शिर्के यांनी सादरीकरण केले.
कार्यक्रमाचे संचालन डॉ. विजय अग्रवाल यांनी केले. यावेळी विविध नगर पालिकांचे अध्यक्ष, नगर सेवक, नगरसेविका, सामाजिक संस्थाचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
००००००
वृत्त क्र. 308
लोकशाही दिनात तीन स्वीकृत तक्रार अर्ज प्राप्त
यवतमाळ, दि. 3 : महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणा-या लोकशाही दिनात एकूण तीन स्वीकृत तक्रार अर्ज प्राप्त झाले तर 81 सामान्य तक्रारी प्राप्त झाल्या. बळीराजा चेतना भवन येथे आयोजित या लोकशाही दिनाला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रिकर, उपजिल्हाधिकारी सुविता चौधर आदी उपस्थित होते.
प्राप्त झालेल्या तक्रारीमध्ये जिल्हा परिषद, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी आणि जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयसंदर्भात प्रत्येकी एक तक्रार अशा एकूण तीन तक्रारी प्राप्त झाल्या. तसेच मागील लोकशाही दिनी प्रलंबित तक्रारीपैकी एक तक्रार निकाली काढण्यात आली.
ज्या विभागाकडे लोकशाही दिनातील तक्रारी प्रदीर्घ कालावधीपासून प्रलंबित आहे, त्या तातडीने निकाली काढण्यात याव्या, अशा सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सर्व विभागांना दिल्या. तसेच यावेळी त्यांनी लोकशाही दिनातील प्रलंबित प्रकरणांचा आढावा घेतला.
बैठकीला विविध विभागाचे विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी