फासेपारधी समाजाच्या समस्यांसंदर्भात जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक



v विविध योजनेंतर्गत लाभ देण्याचे अधिका-यांना निर्देश
        यवतमाळ, दि. 13 :  जिल्ह्यातील पारधी बेड्यावर राहणा-या फासेपारधी समाजाच्या विविध समस्यासंदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, दारव्हाचे तहसीलदार अरुण शेलार, दादाजी आदिवासी फासेपारधी समाज संघटनेचे अध्यक्ष मतीन भोसले, सहदेव पवार, पारधी समाज संघटनेचे बाबाराव राठोड आदी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, फासेपारधी समाजाला मुलभूत सुविधा देण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. शिधापत्रिका, आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, जातीचा दाखला आदी आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी उपविभागीय अधिका-यांनी विशेष मोहीम हाती घ्यावी. जिल्ह्यातील विविध पारधी बेड्यांवर महिलांचे बचत गट निर्माण करण्यासाठी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने नियोजन करावे. या महिला बचत गटांना उमेदमार्फत आर्थिक लाभ देण्यात येईल. सुशिक्षित समाजबांधवांना रोजगारासाठी मुद्रा बँक योजनेंतर्गत शिशु गटातून कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी अग्रणी बँक व्यवस्थापकांनी  लक्ष द्यावे. मुद्रा बँक कर्जासाठी अर्ज केलेल्या पाच युवकांना त्वरीत हे कर्ज उपलब्ध करून देण्याचे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यातील विविध पारधी बेड्यांची तालुकानिहाय माहिती प्रशासनाकडे दिल्यास त्यांना आवश्यकतेनुसार योजना देणे सुलभ होईल. त्यामुळे पाडानिहाय ही यादी त्वरीत उपलब्ध करून द्यावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी पारधी समाजाकडून जिल्ह्यातील गणेशपूर, मुकींदपूर, गोपालनगर, कापरा बेडा आदी मोठ्या पारधी बेड्यांना महसुली गावांचा दर्जा द्यावा. पारधी समाजातील युवकांवर पोलिसांनी जाणीवपूर्वक लावलेले गुन्हे परत घ्यावे. समाजातील युवक-युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यावी. समाजबांधवांना कुक्कुटपालन, शेळीपालन आदींची प्रशिक्षण द्यावे, आदी मागण्या प्रशासनाकडे करण्यात आल्या. बैठकीला पारधी समाजाचे पोलिस पाटील अजुबा भोसले, ओंकार पवार, नंदू पवार यांच्यासह दारव्हा, नेर, आर्णि आणि राळेगाव येथील समाजबांधव उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी