पिण्याचे पाणी, रोजगार, शिक्षण, आरोग्याला खनिज विकास निधीतून भरघोस निधी - पालकमंत्री मदन येरावार




v जिल्हास्तरीय खनिज विकास प्रतिष्ठानची बैठक
यवतमाळ, दि. 6 : जिल्ह्यात राबविण्यात येणा-या विविध विकास कामांसाठी जिल्हा नियोजन समिती तसेच इतर शिर्षकांमधून निधी दिला जातो. मात्र विकास कामे करण्याकरीता अतिरिक्त निधीची आवश्यकता असली तर खनिज विकास निधीतून ही कामे केली जातात. मुलभुत गरजा लक्षात घेता नागरिकांना पिण्याचे पाणी, रोजगार, शिक्षण आणि आरोग्यासाठी आता खनिज विकास निधीतून 70 ते 80 कोटी रुपये देण्यात येतील, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हास्तरीय खनिज विकास प्रतिष्ठानच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार डॉ. अशोक उईके, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा खनीकर्म अधिकारी राजेंद्र गोसावी आदी उपस्थित होते.
जिल्ह्याचा खनिज विकास निधी हा डिपॉझिट निधी असतो, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यातील सर्व जीर्ण अंगणवाड्यांच्या इमारतींचे नवीन बांधकाम तसेच इमारती चांगल्या असल्यास मुलभूत सोयीसुविधांची पुर्तता याकरीता जिल्हा परिषदेने खनिज विकास निधीकरीता त्वरीत प्रस्ताव तयार करावा. पाणी पुरवठा योजनेमधील एकही गाव पाण्यापासून वंचित राहू नये. खनिज विकास निधीमधून देण्यात येणा-या पैशातून एकही नळ योजना दुरुस्तीशिवाय राहणार नाही, याची काळजी ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने घ्यावी. आरोग्याच्या बाबतीत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय येथे अत्याधुनिक उपकरणे, औषधी व इतर कोणत्याही गोष्टीची कमतरता राहणार नाही. संरक्षण भिंतीपासून तर रंगरंगोटीपर्यंत सर्व कामे खनिज विकास निधीतून करण्यात येतील. कौशल्य विकासांतर्गत सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. नोकरीकरीता लागणा-या प्लेसमेंटसाठी कंपन्या येथे येण्यास तयार आहे. त्यामुळे या युवक-युवतींच्या प्रशिक्षणाचा खर्च खनिज विकास निधीतून करण्यात येईल. पाणी पुरवठा योजना, रोजगार, शिक्षण, आरोग्य या मुलभुत गरजांसाठी निधीची कमतरता पडू देणार नाही. त्यामुळे यासाठी खनिज विकास निधीतून 70 ते 80 कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करण्यात येईल, असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
आतापर्यंत ज्या ज्या विकास कामांसाठी खनिजचा निधी देण्यात आला आहे, ती कामे संबंधित विभागाने त्वरीत पूर्ण करावीत. जिल्ह्याची अभ्यासिका, जिल्ह्याचे क्रीडा संकूल, जिल्ह्याचे रुग्णालय अत्याधुनिक करण्यावर भर आहे. तालुका क्रीडा संकूलाबाबत जिल्ह्यातून आलेले प्रस्ताव तात्काळ खनिज विकास निधीमध्ये समाविष्ठ करा. ज्या ग्रामपंचायतींनी विद्युत सहाय्यकाची मागणी केली आहे, अशा ग्रामपंचायतींना सहाय्यक देण्यासाठी जिल्हा परिषदेमधून यादी घेऊन त्यांच्या नेमणुका करा. प्राथमिक आरोग्य केंद्रनिहाय आरोग्य शिबिर घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉक्टरांकडून रोगनिदान करण्याचे नियोजन आरोग्य विभागाने करावे. पाणी पुरवठा योजनेची सर्व कामे त्वरीत संपवा, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या.
यावेळी खनिज विकास प्रतिष्ठानचे सदस्य तसेच विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी