अनधिकृत बि-बियाणे विक्री प्रतिबंध व किटकनाशक हाताळणी पूर्वतयारीबाबत जिल्हाधिका-यांनी घेतली कृषी व पोलिस विभागाची बैठक


यवतमाळ, दि. 21 : खरीप हंगामामध्ये अनधिकृत कपाशी बियाणे / तणनाशक, सहनशील कपाशी बियाणांची विक्री, वापर आणि वाहतुकीवर प्रतिबंध करणे तसेच विषबाधा होऊ नये म्हणून किटकनाशक हाताळतांना शेतकरी आणि शेतमजुरांसाठी पूर्वतयारीबाबत जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी कृषी, आरोग्य व पोलिस विभागाची आढावा बैठक घेतली.
            जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित या बैठकीला जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, उपअधिक्षक (गृह) अनिलसिंह गौतम, डॉ. कोषटवार, डॉ. घोडेस्वार, उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखेडे, डॉ. प्रशांत नाईक, उदय काथोडे, जगन राठोड, कृषी विकास अधिकारी पंकज बरडे आदी उपस्थित होते.
            यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, अनधिकृत बि-बियाणांना प्रतिबंध करण्यासाठी व्यापक मोहीम राबविणे गरजेचे आहे. यापूर्वी पकडलेल्या प्रकरणात पोलिस विभागाने तात्काळ कार्यवाही करावी. कृषी विभाग ज्या ठिकाणी धाड टाकणार आहे, अशा ठिकाणी पोलिस विभागाने बिट जमादार व शिपाई न देता अधिकारी व इतर कर्मचारी उपलब्ध करून द्यावे. जिल्ह्याच्या सिमेला लागून असलेल्या तेलंगणा तसेच नांदेड, चंद्रपूर, वर्धा व अमरावती या मार्गावर तपासणी नाके लावावे, अशा सुचना केल्या. तसेच गत वर्षात आठ प्रकरणात नोंदविलेल्या गुन्ह्यांचा आढावा घेतला.
            किटकनाशक फवारणी करतांना शेतकरी व शेतमजूरांना विषबाधा होऊ नये म्हणून फवारणी करणा-यांची वैद्यकीय तपासणी करावी. एकही शेतकरी, शेतमजूर वैद्यकीय तपासणीपासून वंचित राहणार नाही, याची कृषी विभागाने दक्षता घ्यावी. तालुका कृषी अधिका-यांनी फवारणी करणा-या नागरिकांची गावनिहाय यादी तयार करून वैद्यकीय तपासणीबाबत नियोजन करावे. आरोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रात तपासणी शिबिर घ्यावे. तसेच जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठातांनी किटकनाशक बाधितांना योग्य उपचार मिळण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व वैद्यकीय अधिकारी तसेच विषबाधित शेतकरी / शेतमजूर ज्या खाजगी रुग्णालयात उपचार घेतात तेथील सर्व डॉक्टरांचे तांत्रिक प्रशिक्षण घ्यावे. कृषी विभागाने विषबाधा जनजागृती मोहीम राबवावी. किटकनाशक फवारणी सुरक्षारक्षक किट खरेदीची कॅशलेस पध्दतीची अट शिथील करून आवश्यक अंमलबजावणीच्या अनुषंगाने सदर प्रस्ताव जिल्हा नियोजन समितीकडे पाठवावा, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
            यावेळी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी यांच्यासह आरोग्य आणि पोलिस विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
००००००

                                                                                      



Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी