सामाजिक न्याय दिनी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार




        यवतमाळ, दि. 26 : सामाजिक न्याय दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय विभाग व समाजकल्याण विभागातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या उपायुक्त जया राऊत, संशोधन अधिकारी एम.जी. वथ, सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, जि.प. समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण, दलितमित्र पुरस्कार विजेते श्री. सोनवणे आदी उपस्थित होते.
            यावेळी मार्गदर्शन करतांना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे म्हणाल्या, राजर्षी शाहू महाराजांनी समतेची शिकवण दिली आहे. सर्व घटकांना सामाजिक न्याय देण्याचे कार्य त्यांनी केले. मागासवर्गीयांसाठी शिक्षण व नोकरीमध्ये आरक्षणाची सुरुवात शाहू महाराजांनी केली. समाजातील दुर्बल घटकांच्या शिक्षणाच्या सोयीसाठी त्यांनी वसतीगृहे उघडली. प्राथमिक शिक्षण सक्तीचे करण्याचा कायदा त्यांनी आपल्या संस्थानात अंमलात आणला. राजर्षी शाहू महाराजांचे विचार निरंतर पुढे नेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे त्यांनी सांगितले.
            अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांनी अनेक शैक्षणिक सुधारणा केल्या. नोकरी आणि शिक्षणात राखीव जागा हे शाहू महाराजांचे धोरण आहे. त्यांनी दुर्बल घटकांसाठी शिष्यवृती सुरू केली. यावेळी प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी म्हणाले, शाहू महाराज आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींनी शिकून नाव कमवावे. शिकणारे व्यक्ती नेहमीच पुढे जातात. समाजकल्याण विभागाने स्पर्धा परिक्षा वर्गासाठी नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.
            यावेळी मान्यवरांच्या हस्ते सलोनी मेश्राम, दिव्या घोसे, साक्षी कळसकर, श्रीवेश नगराळे, साक्षी मुंगळे, भक्ती चव्हाण, अश्विनी राठोड, निता भगत, गायत्री राठोड, ओंकार काटेकर यांना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार देण्यात आला. तसेच सामाजिक न्याय विभागातर्फे चालविण्यात येणा-या निवासी शाळेच्या मुख्याध्यापकांचा उत्कृष्ट कार्याबद्दल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत लाभ मिळालेल्या अमोल मेश्राम, शुभांगी पाईकराव, मनिषा पाटील, वैशाली कांबळे आदींचा सत्कार करण्यात आला.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर यांनी केले. संचालन प्रा. कमल राठोड यांनी तर आभार समाजकल्याण अधिकारी पियुष चव्हाण यांनी मानले. यावेळी निवासी शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थ्यांचे पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी