शेतक-यांसाठी मंडळ स्तरावर कर्जवाटप मेळावे – जिल्हाधिकारी गुल्हाने



v बँकर्सची प्रथम त्रैमासिक बैठक
यवतमाळ, दि. 6 : खरीप हंगामाला सुरवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो. शेतक-यांच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा हंगाम आहे. त्यामुळे शेतक-यांना पीक कर्ज वेळेत मिळावे, यासाठी मंडळ स्तरावर कर्जवाटप मेळावे घेण्याच्या सुचना सर्व उपविभागीय अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. या मेळाव्यात बँकांचे प्रतिनिधी उपस्थित राहतील, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बँकर्सच्या प्रथम त्रैमासिक आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेचे संचालक एस.बी.मिटकरी, जिल्हा उपनिबंधक अर्चना माळवे आदी उपस्थित होते.
यावर्षी जिल्ह्याला 2161 कोटींचे पिक कर्जवाटपाचे उद्दिष्ट आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, पीक कर्जासाठी मंडळ स्तरावर घेण्यात येणा-या मेळाव्यांमध्ये शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशा प्रकारचे नियोजन करण्यात येईल. यावेळी बँकांच्या प्रतिनिधींनीसुध्दा उपस्थित राहून शेतक-यांना सहकार्य करावे. ग्रामसेवक व तलाठी यांनी कर्जाबाबत कागदपत्रे तयार करून बँकेच्या प्रतिनिधींकडे  सादर करावीत. कर्जवाटपाबाबत बँकेच्या अधिका-यांनी संवेदनशीलपणे काम करावे. फासे पारधी, भटके समाज यांचेसुध्दा कर्जासाठी मेळावे घेण्यात येतील. या बांधवांकडे एक-दोन कागदपत्रे कमी असले तरी त्याची पुर्तता करण्यासाठी बँकेच्या अधिका-यांनी स्वत: पुढाकार घ्यावा. या समाज बांधवांनासुध्दा कसे कर्ज मिळवून देता येईल, याकडे लक्ष द्यावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
प्रधानमंत्री जनधन योजनेबाबत बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, जिल्ह्यात या योजनेपासून किती कुटुंब वंचित आहे, त्याची माहिती घेऊन या कुटुंबाचे खाते काढा. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना व प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेंतर्गत ज्यांचे प्रस्ताव प्राप्त झाले आहे, त्यांना विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी बँक अधिका-यांनी लक्ष द्यावे. तसेच विविध महामंडळांची कर्ज प्रकरणे बँकेकडे प्रलंबित ठेवू नका. त्रृटींची पुर्तता करून ही कर्ज प्रकरणे निकाली काढा, असे निर्देश दिले. यावेळी त्यांनी गत बैठकीचा आढावा, जनधन योजना, अटल पेंशन योजना, मुद्रा बँक योजना, छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना, ग्रामीण रोजगार प्रशिक्षण आदींचा आढावा घेतला.
जिल्ह्याला देण्यात आलेल्या कर्ज वाटपाच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत 419 कोटी 25 लक्ष रुपयांचे पीक कर्जवाटप करण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 327.57 कोटींचे वाटप केले आहे. यावेळी बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी