राष्ट्रीयकृत बँकांनी शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप करावे



जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली बँक अधिकाऱ्यांची झाडा-झडती
यवतमाळ, दि. 17 : जिल्ह्याला यावर्षी खरीप हंगामाचे 2161 कोटींचे कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. यात आतापर्यंत जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने 66 टक्के कर्ज वाटप केले आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँका यात माघारल्या असून त्याचे कर्ज वाटप केवळ 16 टक्के आहे. राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज वाटपाची आपली प्रगती तात्काळ सुधरवावी. त्यासाठी शेतकऱ्यांची कोणत्याही प्रकारची अडवणूक न करता बँकांनी शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशा सक्त सुचना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी बँक अधिकाऱ्यांना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कर्ज वाटपाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अग्रणी बँक व्यवस्थापक विजय भगत, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक अरविंद देशपांडे, यांच्यासह बँकेचे प्रतिनिधी उपस्थित होते. खरीप हंगामाला सुरवात होताच शेतकरी पीक कर्जासाठी बँकांकडे धाव घेतो, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले. कर्जवाटपाबाबत बँकेच्या अधिका-यांनी संवेदनशीलपणे काम करावे. आतापर्यंत जिल्ह्यात 29 टक्के कर्जवाटप झाले आहे. गतवर्षी या वेळेसपर्यंत 19 टक्के कर्ज वाटप करण्यात आले होते. गतवर्षीपेक्षा हा आकडा 10 टक्क्यांनी जास्त असला तरी सर्व पात्र शेतकऱ्यांना तात्काळ कर्ज वाटप  उपलब्ध करून देण्याची जबाबदारी बँकांची आहे. त्यामुळे बँकांनी गांर्भियपणे काम करावे. मंडळ स्तरावर अर्ज द्या कर्ज द्या या मेळाव्याचे आयोजन मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. यात शेतकऱ्यांनी उपस्थित राहून कर्ज वाटप मेळाव्याच्या लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. तसेच ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज वाटपात दिगंगाई करेल किंवा विनाकारण त्रास देईल, अशा बँकांवर कडक कार्यवाही करण्यात येईल, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी खडसावले.
तसेच बँकेने पिकविमा हप्ता कपात करणे गरजेचे आहे व पिक विम्याची माहिती व्यवस्थित भरुण त्यात त्या शेतक-याचा आधार नंबर टाकणे आवश्यक आहे. त्याचबरोबर शेती कुठेही असली तरी ज्या गावचा रहिवासी असेल त्याला तिथे कर्ज द्यावे. तसेच सर्व बँकानी महिना अखेर पर्यंत किमान 50% कर्ज वाटप करावे, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी केल्या.
जिल्हा प्रशासनाच्यावतीने उमरखेड तालुक्यात ढाणकी, मुळावा, उमरखेड, ब्राम्हणगाव, महागाव तालुक्यात फुलसावंगी, महागाव, हिवरा, गुंज, घाटंजी तालुक्यात शिरोली, शिवणी अशा विविध ठिकाणी कर्ज मेळावे घेण्यात आले आहे व हे कर्ज मेळावे समोरसुध्दा नियमित सुरु राहतील, असे प्रशासनाने कळविले आहे.
००००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी