जिल्हा प्रशासन व सामाजिक संघटनांच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन









v पालकमंत्री व जिल्हाधिका-यांच्या शुभेच्छा संदेशाचे वाचन
v नागरिकांसह अधिकारी व कर्मचा-यांनी केली योगासने
        यवतमाळ, दि. 21 :  जिल्हा प्रशासन, पोलिस विभाग, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पतंजली योग समिती, श्री. जनार्दन स्वामी योगाभ्यासी मंडळ, आर्ट ऑफ लिव्हिंग तसेच योगाक्षेत्रात कार्यरत विविध सामाजिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने हेलिपॅड ग्राऊंड येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.
            कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, एसबीआयचे शाखा प्रबंधक सुहास ढोले, बीएसएनएलचे उपमहाप्रबंधक डी.एस.डांगे, पतंजली योग समितीचे दिनेश राठोड, शंतनु शेटे, राजू पडगीलवार, मोहन तिवसकर आदी उपस्थित होते.
            यावेळी ज्ञानेश्वर सुरजुसे, संजय चाफले, महेश जोशी, माया चव्हाण, मनिष गुबे या योगशिक्षकांनी उपस्थितांना विविध योगासने करून दाखविली. तसेच नागरिकांकडून योगासनांची प्रात्यक्षिकेसुध्दा करून घेतली. यात ताडासन, त्रिकोनासन, अर्धचक्रासन, दंडासन, भद्रासन, वज्रासन, वक्रासन, घुटना संचलन, अर्ध हलासन, पवन मुक्तासन, कलापभाती, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम, ध्यानसाधना आदींचा समावेश होता.
            तत्पूर्वी कार्यक्रमाचे अध्यक्ष जलज शर्मा यांनी उपस्थितांना योगसाधनेची शपथ दिली. यावेळी श्रेया इरतकर आणि सिध्दी सोळंके या विद्यार्थीनींनी योगावर आधारीत नृत्य तर गजानन इरतकर यांनी वामनवली हा योगासनातील पोटाचा व्यायाम करून दाखविला.
            पालकमंत्री मदन येरावार यांचा शुभेच्छा संदेश शंतनु शेटे यांनी वाचून दाखविला. पाच हजार वर्षांपासून असलेली योग विद्या भारताने जगाला दिलेली अमुल्य देणगी आहे. भारताची ही अमुल्य विद्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचवली. माणसाला अंतर्गत तसेच बाह्यस्वरुपी निरोगी करून दीर्घायुष्य प्रदान करण्याचे सामर्थ्य योगामध्ये आहे. निरोगी जीवनासाठी योग आवश्यक असून धकाधकीच्या जीवनात तणावमुक्त, रोगमुक्त आणि निरामय जीवन केवळ नियमित योग केल्यामुळेच जगता येते. प्रशासन आणि विविध संघटनांच्या वतीने आयोजित या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात आपण मोठ्या संख्येने उपस्थित झालात. योगाला जीवनाचा अविभाज्य अंग बनविण्यासाठी इतरांनाही प्रेरीत करा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. तसेच मुंबईत विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्यामुळे या कार्यक्रमाला उपस्थित राहता आले नाही, अशी खंत त्यांनी शुभेच्छा संदेशातून व्यक्त केली.
            जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचा शुभेच्छा संदेश निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे यांनी वाचून दाखविला. आपल्या संदेशात जिल्हाधिकारी म्हणाले, शरीर निरोगी असेल तरच कार्यक्षमता वाढते. कोणत्याही क्षेत्रात योग्य व तितकेच लवकर निर्णय घेण्यासाठी आरोग्यदायी जीवनाचे खूप महत्त्व आहे. आज सर्वजण योगसाधनेकरीता जमलो असलो तरी निरंतर योगाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ही सामुहिक कृती फार महत्वाची ठरणार आहे. सर्वांनी चांगल्या, आरोग्यदायी सवयींसाठी आग्रह धरावा. जेणेकरून भविष्यात भारत एक निरोगी, मजबूत व कणखर देश म्हणून जगात आपली प्रतिमा आणखी उंचावेल, असे आशावाद त्यांनी व्यक्त केला.
            कार्यक्रमाचे संचालन राजू पडगीलवार यांनी तर आभार जितेंद्र सातपुते यांनी मानले. कार्यक्रमाला भारत स्वाभिमानी ट्रस्ट, शारीरिक शिक्षण शिक्षक संघटना, नेहरू युवा केंद्र, क्रीडा भारती, आरोग्य भारती, आयुष विभाग, आयुर्वेद महाविद्यालय यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आणि नागरिक उपस्थित होते.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी