जिल्हाधिका-यांनी घेतली बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक




             यवतमाळ, दि. 24 :  खरीप हंगाम व पेरणीच्या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बियाणे कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक घेतली. यावेळी प्रभारी कृषी विकास अधिकारी पंकज बराडे व विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
            मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकरी अजय गुल्हाने म्हणाले, दोन वर्षापूर्वी जिल्ह्यात किटकनाशक फवारणीच्या दुर्देवी घटना घडल्या होत्या. मात्र गतवर्षी प्रशासन, कृषी विभाग तसेच आरोग्य विभागाच्या प्रयत्नाने त्याची पुनरावृत्ती झाली नाही. यावर्षीसुध्दा ही काळजी सर्वांना घ्यावयाची आहे. त्यासाठी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी, किटकनाशक वितरक, विक्रेते आदींचे सहकार्य आवश्यक आहे. फवारणी करणारे शेतकरी, शेतमजूर आदींचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. तसेच किटकनाशक फवारणीबाबत जनजागृती शिबिरेसुध्दा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी म्हणाले.
            बियाणे, किटकनाशक वितरक आणि विक्रेत्यांनी शेतकरी प्रशिक्षण आणि जनजागृती शिबिराबाबत वेळापत्रक तयार करावे. तसेच आपल्या सामाजिक दायित्व निधीअंतर्गत फवारणी करणा-यांसाठी सुरक्षा रक्षक किट उपलब्ध करून द्याव्यात. बळीराचा चेतना अभियानांतर्गत असलेल्या समितीकडे या किट राहतील. ज्यांना फवारणी करावयाची आहे ते या समितीकडून किट घेतील व फवारणी झाल्यानंतर परत करतील. बरेचदा फवारणी करणारे शेतकरी, शेतमजूर सुरक्षा रक्षक किटकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे फवारणी करणा-या नागरिकांना याबाबत अवगत करणे गरजेचे आहे. जिल्ह्यात प्रतिबंधित असलेल्या बियाणांची वाहतूक, विक्री होत असेल तर त्यांची माहिती त्वरीत द्यावी. जेणेकरून त्यांच्यावर कारवाई करता येईल. माहिती देणा-या व्यक्तिचे नाव प्रशासनामार्फत गुपीत ठेवण्यात येईल, असेही जिल्हाधिका-यांनी सांगितले.
            यावेळी बायर, राशी, महाबीज, मोनसॅन्टो, कावेरी, इगल, सिंजेंटा, आयआयएल, अंकूर आदी बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी