क्लेम केलेल्या शेतक-यांना पिक विम्याचा लाभ त्वरीत द्या - परिवहन मंत्री रावते





v सावरला आणि वणी येथे शेतकरी संवाद
यवतमाळ, दि. 30 : शेतक-यांना मिळणा-या पीक विम्याची बहुतांश रक्कम शासनातर्फे भरली जाते. शेतक-यांना केवळ नाममात्र रकमेचा भरणा करावा लागतो. ज्या शेतक-यांचे नुकसान झाले आहे व ज्यांनी क्लेम केले आहे अशा शेतक-यांना पीक विम्याचा त्वरीत लाभ मिळवून देण्यासाठी प्रशासनाने पाठपुरावा करावा, अशा सुचना परिवहन व खारभुमी विकास मंत्री दिवाकर रावते यांनी केलया.
वणी तालुक्यातील सावरला व वणी येथे शेतक-यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, उपविभागीय अधिकारी डॉ. शरद जावळे, जिल्हा अधिक्षक व कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर, अविनाश सोमलकर, तहसीलदार श्याम धनमने, सरपंच विनोद चोपणे आदी उपस्थित होते.
विमा संदर्भात अनेक शेतक-यांच्या तक्रारी येतात, असे सांगून परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले, शेतक-यांना विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी शासनाने निर्णय घेतला आहे. सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठीच शेतकरी संवाद घेण्यात येत आहे. क्लेम मंजूर झाला असेल आणि बँकेच्या काही अडचणी असेल तर त्या त्वरीत सोडवाव्यात. विमा कंपनीने शेतक-यांना त्वरीत रक्कम उपलब्ध करून द्यावी. विम्याच्या लाभासाठी आता आधार कार्डचा उपयोग करण्यात येणार असल्याचे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितले आहे. याबाबत ग्रामसेवक आणि सरपंचांनी शेतक-यांना माहिती द्यावी. पिक विमा संदर्भात सर्व कंपन्यांची बैठक लवकरच मुंबईत घेण्यात येईल. या संदर्भात दिल्लीपर्यंत पाठपुरावा केला जाईल, असे त्यांनी सांगितले.
पिक विमा संदर्भात पाहणी करून पाहणीचा अहवाल सादर करण्याच्या सुचना अधिका-यांना देण्यात आल्या आहेत. विम्याच्या रकमेचा फायदा शेतक-यांना झाला पाहिजे. शेतक-यांच्या आनंदासाठी काम करा, असेही ते म्हणाले. जनावरांकडून होणारे पिकांच्या नुकसानीनुसार शेतक-यांना मोबदला मिळाला पाहिजे, अशी मागणी यावेळी शेतक-यांनी केली. यासंदर्भात शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
पावसाअभावी दुबार पेरणीचे संकट ओढावलेल्या शेतक-यांना परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बियाणे आणि खतांचे वाटप करण्यात आले. यात पठारपूर येथील नागो टेंभुर्डे, बाबाराव महाकुलकार, कुंद्रा येथील बाबाराव उपासे, माधव आसुटकर, कोलगाव येथील मंदा लांबट, शिवनाळा येथील फुलाबाई आत्राम, धानोरा येथील संतोष वासाड यांच्यासह वणी, मारेगाव आणि झरीजामणी येथील शेतक-यांना बियाणे आणि खतांचे वाटप करण्यात आले.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी