त्रस्त कुटुंबास पेरणी/बियाणे करीता पाच हजार रुपयांपर्यंत मदत


v बळीराजा चेतना अभियानच्या ग्रामस्तरीय समित्यांमार्फत होणार वाटप
        यवतमाळ, दि. 14 :  बळीराजा चेतना अभियानांतर्गत जिल्ह्यात 1483 ग्रामस्तरीय समित्या कार्यरत आहेत. या समित्यांच्या माध्यमातून खरीप हंगाम 2019-20 करीता गावातील त्रस्त कुटुंबास पेरणी / बियाणांकरीता पाच हजार रुपयांपर्यंतची मदत देण्यात येणार आहे.
नैसर्गिक आपत्ती, अवकाळी पाऊस, दुष्काळ आदी कारणांमुळे नैराश्यग्रस्त असलेल्या शेतक-यांचे मनोबल उंचावणे, त्यांच्यामध्ये जगण्याची प्रेरणा निर्माण करणे याकरीता जिल्ह्यात विशेष मदत कार्यक्रमांतर्गत बळीराजा चेतना अभियान सुरू करण्यात आले. या अंतर्गत ग्रामसभेने मंजूरी दिलेल्या त्रस्त कुटुंबास पेरणी / बियाणे करीता एका प्रकरणी जास्तीत जास्त पाच हजार रुपयांपर्यंत आर्थिक मदत देण्याबाबत तरतूद आहे. जिल्ह्यातील प्रति ग्रामस्तरीय समिती 24 हजार रुपये याप्रमाणे एकूण 1483 ग्रामस्तरीय समित्यांना 3 कोटी 55 लक्ष 92 हजार इतका निधी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला आहे.
सदर निधीतून सन 2019 च्या खरीप हंगामाकरीता गावातील ग्रामसभेने बहुसंख्येने मंजुरी दिलेल्या त्रस्त कुटुंबांना  ग्रामस्तरीय समित्यांमार्फत आर्थिक मदत दिली जाणार आहे. तरी संबंधित त्रस्त शेतक-यांनी पेरणी / बियाणे करीता घ्यावयाच्या आर्थिक मदतीकरीता ग्रामस्तरीय समितीचे अध्यक्ष किंवा सचिवांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी