महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानतर्फे बिटरगावात 59 विकास कामांचे उद्घाटन तर 30 चे लोकार्पण





यवतमाळ, दि. 5 : महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून उमरखेड तालुक्यातील बिटरगाव येथे गावातील पाणी, शिक्षण, रस्ते व इतर मुलभुत प्रश्न मार्गी लागले आहेत. गावामध्ये आजपर्यंत विविध योजनेतून झालेल्या 59 कामांचे लोकार्पण तसेच 30 कामांचा भुमिपूजन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  सरपंच प्रकाश पेंधे तर प्रमुख अतिथी म्हणून आदिवासी विकास महामंडळाचे उपाध्यक्ष उत्तमराव इंगळे, आमदार राजेंद्र नजरधने, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, उमरखेडचे नगराध्यक्ष नामदेव ससाने आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना उत्तमराव इंगळे म्हणाले, गावाचा विकास होण्यासाठी सर्वांची एकता महत्वाची आहे. ॲक्सिस बँक फाऊंडेशनच्या सहकार्याने महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियान जिल्ह्यातील 76 गावांमध्ये विकास कामे करीत आहे. यासाठी 39 मुख्यमंत्री ग्राम प्रवर्तक जिल्ह्यातील गावामध्ये कार्यरत आहे. विविध विकास कामांमुळे या गावांचा कायापालट झाला आहे. आदिवासी विकास विभागाच्या योजना लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी अधिका-यांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. आमदार राजेंद्र नजरधने म्हणाले, विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. सामाजिक प्रक्रियेतून विकास झाला पाहिजे. जोपर्यंत शासन आणि प्रशासन एकत्र येत नाही तोपर्यंत विकास होणार नाही. शेवटच्या घटकातील माणसाला न्याय मिळण्याकरीता सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, यवतमाळ जिल्ह्यात विविध गावात महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तनाच्या माध्यमातून अनेक कामे हाती घेण्यात आली आहे. शासनाच्या विकास योजना निरंतर चालल्या पाहिजे. बिटरगावात अनेक योजनांचे लोकार्पण आणि समोर करावायाच्या कामांचे भुमिपूजन करण्यात आले. यासाठी आता लोकांनी पुढाकार घ्यावा. बिटरगाव हे आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असेही त्यांनी सांगितले.  
बिटरगावमध्ये महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावातील 3 जिल्हा परिषद शाळा या डिजीटल करण्यात आल्या आहेत. गावकऱ्यांना पिण्यासाठी शुध्द पाणी मिळावे याकरीता आरो फिल्टर मशीन व एटीएम बसविले आहेत. शाळेमध्ये बोलक्या भिंती उपक्रम राबवला असून समाज मंदीर व शाळेमध्ये रंगरंगोटीचे काम केले आहे. गावात अभ्यासिका तयार करून त्यासाठी फर्निचर व पुस्तके खरेदी करण्यात आली आहे. बचत गटाच्या प्रशिक्षणासाठी विविध साहित्याची खरेदी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री ग्रामपरिवर्तक प्रल्हाद पवार आणि गावक-यांच्या मदतीने गावात गेल्या दोन वर्षात ही विकास कामे करण्यात आलेली आहे. डोहा मॉडेल, फॉर्म डेव्हलपमेंट ड्रेनेज प्रोग्राम, सार्वजनिक ठिकाणी वृक्ष लागवड, सिमेंट बाकडे बसविणे, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती, शेतकऱ्यांचा अभ्यास दौरा, बचत गटांना टेलरींग प्रशिक्षण, प्रकारची विकास कामे महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत गावामध्ये होणार आहेत.
 लोकार्पणाच्या कामांमध्ये आरो फिल्टर मशिन बसविणे, बचत गटांना प्रशिक्षण देणे व साहित्य खरेदी, सोसायटी हॉलची रंगरंगोटी तसेच बोलक्या भिंतीसह शाळांची रंगरंगोटी, गावात अभ्यासिका तयार करण्यासाठी पुस्तके खरेदी व फर्निचर खरेदी, डीजीटल जिल्हा परिषद शाळा, नर्सरी साहित्य खरेदी, आरोसाठी एटीएम बसविणे, गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी विद्युत कनेक्शनसह बोअरवेल अशा एकूण 59 कामांचा समावेश  आहे. त्याची एकूण किंमत 2 कोटी 11 लक्ष 90 हजार 127 रुपये आहे.
तर भुमिपूजनाच्या कामांमध्ये बिटरगाव ते नानाकपूर हॉट मिक्स डांबरीकरण रस्ता, अहिल्याबाई होळकर चौक सुशोभिकरण व पेवरब्लॉक बसवणे, तलाठी भवन कार्यालय, समाज मंदिरात पेवरब्लॉक बसवणे, बौध्द विहार जवळ पाण्याची टाकी निर्माण करणे, हनुमान मंदिराजवळ बाल उद्यान तयार करणे, नवीन अंगणवाडी इमारत बांधकाम, भोजनगर तांडा गावांतर्गत नळ योजना अशा 30 कामांचा समावेश आहे. त्याची एकूण किंमत 6 कोटी 71 लक्ष 32 हजार 675 रुपये आहे.
            कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तक प्रल्हाद पवार यांनी केले. संचालन गजानन नरसलवाड यांनी तर आभार प्रकाश भेदेकर यांनी मानले. कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्या रेखा आडे, बांधकाम सभापती रमेश आडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेश कुळकर्णी, उपवनसंरक्षक अरविंद मुंढे, उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडनीस, गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीश शास्त्री, मुख्यमंत्री ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानचे व्यवस्थापक युवराज सासवडे यांच्यासह मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी