पावसाअभावी होरपळलेल्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करा - आदिवासी विकास मंत्री डॉ.अशोक उईके






v मादणी, कृष्णापूर, कोटंबा, पिंपरी इजारा गावातील पिकांची पाहणी
यवतमाळ, दि. 27 : खरीप हंगामात पावसाने दडी मारल्याने शेतक-यांचे नुकसान झाले आहे. पेरणी झालेली पिके पावसाअभावी पूर्णपणे मृतावस्थेत आहेत. या शेतक-यांना दिलासा देण्यासाठी शासनाकडे अहवाल पाठवून आर्थिक मदत देण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी परिसरातील गावांत नुकसान झालेल्या पिकांचा तात्काळ सर्व्हे करावा, अशा सुचना आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी तहसीलदार तसेच संबंधित अधिका-यांना दिल्या.
बाभुळगाव तालुक्यातील मादणी, कृष्णापूर, कोटंबा, नायगाव आदी गावांचा दौरा करून नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी ते गावक-यांशी संवाद साधत होते. डॉ. अशोक उईके पुढे म्हणाले, परिसरातील मादणी, कोटंबा, कृष्णापूर, पिंपरी इजारा, नायगाव, पंचगव्हाण, झपारखेड, उमरडा, गणोरी या आठ-दहा गावांमध्ये पिकांची परिस्थिती अतिशय गंभीर आहे. जिल्ह्यात सरासरीपेक्षा अतिशय कमी पाऊस झाल्यामुळे पिके हातून जाण्याची वेळ आली आहे. या गावांत तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, पोलिस पाटील, कोतवाल आणि बळीराजा चेतना अभियान समितीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतीचा सोबतच कर्जमाफी, कर्जाचे पुनर्गठण, तुरीचे चुकारे याबाबत पंचनामा करावा. तसा अहवाल 2 ऑगस्टपर्यंत जिल्हाधिका-यांकडे सुपूर्द करावा. ही बाब शासन स्तरावर तात्काळ मांडून शेतक-यांना दिलासा देण्यासाठी नक्कीच प्रयत्न केले जाईल. तसेच शेतक-यांच्या समस्यांबाबत  तहसीलदारांनी परिसरातील बँक मॅनेजर, कृषी अधिकारी यांच्या नियमित बैठका घ्याव्यात, अशाही सुचना त्यांनी दिल्या.
यावेळी शेतक-यांनी कर्जमाफीचे पैसे जमा न होणे, पीक विम्यापासून वंचित राहणे, तूरीचे चुकारे न मिळणे आदी समस्या मांडल्या. या समस्यांचे निराकरण करण्याचे निर्देश आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी दिले. तत्पूर्वी त्यांनी शेतात जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली. यावेळी बाभुळगावचे तहसीलदार आनंद देऊळगावकर, गटविकास अधिकारी रमेश दोडके, तालुका कृषी अधिकारी अशोक चव्हाण, लक्ष्मण येलके, मंडळ अधिकारी एस.एन. महिंद्रे, सरपंच सुभाष धोटे, सतिश मानलवार यांच्यासह गावकरी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी