विभागीय आयुक्तांनी घेतला विविध विषयांचा आढावा






यवतमाळ, दि. 26 : अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी यवतमाळ जिल्ह्यात शासनाच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी मुख्य वनसंरक्षक आर.के. वानखेडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी आधिकारी जलज शर्मा, उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, अरविंद मुंढे, के. अभर्णा, अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे आदी उपस्थित होते.
33 कोटी वृक्ष लागवडी मोहिमेचा आढावा घेतांना विभागीय आयुक्त पियुष सिंह म्हणाले, विविध विभागांना देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी दररोज वृक्ष लागवड करा. नोंदणी पोर्टलमध्ये रोजचा आकडा बदलत राहणे आवश्यक आहे. गत तीन वर्षांपासून हा उपक्रम सुरू आहे. ठराविक कालावधीत ही मोहीम पुर्ण करावयाची आहे. 15 ऑगस्टपर्यंत राज्यात 80 टक्के वृक्ष लागवड झाली पाहिजे, अशा वनमंत्र्यांच्या सुचना आहे. त्यासाठी अमरावती विभागाने चांगले काम करणे अपेक्षित आहे. वृक्ष लागवडीकरीता जेवढे खड्डे झाले आहेत, त्यावर उपवनसंरक्षकांनी लक्ष केंद्रीत करावे, अशा सुचना त्यांनी दिल्या.
प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा आढावा घेतांना ते म्हणाले, लाभार्थ्यांची नावे अचूक अपलोड करा. तांत्रिक कारणास्तव जी नावे अपलोड होऊ शकत नाही, ती सोडून इतर नावे थांबवू नका. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात सर्व उपविभागीय अधिकारी, निवडणूक अधिका-यांनी आपापल्या मतदारसंघात नाव नोंदणी, मतदार फोटो ओळखपत्र, मयत मतदारांची नावे वगळणे आदी कामे काळजीपूर्वक करावी. तसेच विशेष मोहीम राबवून नवीन मतदारांची नावे मतदारयादीत समाविष्ठ करावीत. जागेचे अंतर, मतदारांची संख्या आदी गोष्टी लक्षात घेऊन मतदान केंद्रांची संख्या वाढवायची असेल तर तशी कार्यवाही करावी. तसेच याचा अहवाल सादर करावा.
स्थायी / अस्थायी भाडेपट्ट्यांबाबत आतापर्यंत किती कॅम्प घेण्यात आले आहेत, किती नागरीक उपस्थित होते, आदींची त्यांनी विचारणा केली. यावेळी विभागीय आयुक्तांनी ई-फेरफार, पीक कर्जवाटप, ई-स्कॅनिंग, महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानांतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजना आदींचा आढावा घेतला.
बैठकीला सर्व उपविभागीय अधिकारी, तहसीलदार तसेच विविध विभागाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी