दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्ष लागवड करा - पालकमंत्री मदन येरावार





v ऑक्सिजन पार्क येथे झाडांचा वाढदिवस साजरा
यवतमाळ, दि. 12 : देशात 125 कोटी लोकसंख्येपैकी 60 टक्के लोकसंख्या ही शेतीवर अवलंबून आहे. शेतीसाठी पाण्याची गरज आहे. पावसाचे प्रमाण वाढवायचे असेल तर जास्तीत जास्त झाडे लावणे आवश्यक आहे. झाडामुळे पाणी आणि पाण्यामुळे समृध्दी हा एकमेव मार्ग असल्यामुळे भविष्यात दुष्काळावर मात करण्यासाठी जास्तीत जास्त वृक्ष लागवड करा, असे आवाहन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
ऑक्सीजन पार्क येथे यवतमाळ वन विभागाच्यावतीने आयोजित वृक्षदिंडीचा समारोप व वृक्षांचा पहिला वाढदिवस साजरा करतांना ते बोलत होते. मंचावर उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, भारतीय वन सेवेचे अधिकारी अर्जुना, वनपरिक्षेत्र अधिकारी सी.एस.गावंडे आदी उपस्थित होते.
राज्य सरकारने चार वर्षात राज्यात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला आहे, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, या उपक्रमात शासकीय विभागासोबतच अनेक सामाजिक संघटना मनापासून सहभागी झाल्या. त्यामुळेच वृक्ष लागवड मोहीम ही लोकचळवळ बनली. वन विभागानेसुध्दा यासाठी अतिशय मेहनत घेतली. गेत्या पाच वर्षात वन विभागाचा नावलौकिक वाढला आहे. वन मोठे की धन मोठे, याचा विचार जर केला तर श्वास रोखून आपण पैसे मोजू शकत नाही.  त्यामुळे मोफत मिळणा-या ऑक्सीजनची किती गरज आहे, हे यावरून लक्षात येते. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सरासरी 33 टक्के वनक्षेत्र आवश्यक आहे. मात्र अजूनही आपले राज्य सरासरीपेक्षा जवळपास 13 टक्क्यांनी कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
वृक्षांना सगेसोयरे मानण्याची आपली परंपरा आहे. तुळशीच्या झाडाचा औषधी म्हणून उपयोग होतो तर वडाच्या झाडापासून आपल्याला सर्वात जास्त ऑक्सीजन मिळतो. वन विभागाच्या परिश्रमामुळे शहरात जांब पार्क येथे वनउद्यान, ऑक्सीजन पार्क, ढुमणापूर येथे बांबू व चंदन पार्क विकसीत होत आहे. शासनानेसुध्दा शुभेच्छा वृक्ष, माहेरची झाडी, आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष अशा संकल्पना आणल्या आहेत. नागरिकही या संकल्पना आत्मसाद करीत आहे. ही लोकचळवळ आणखी जोमाने वाढविणे यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी ऑक्सीजन पार्क येथे वृक्षांचा पहिला वाढदिवस पालकमंत्र्यांच्या हस्ते केक कापून साजरा करण्यात आला. तर ढुमणापूर येथील बांबु व चंदन उद्यानात पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते वृक्षारोपन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी केले. यावेळी अमलोकचंद हायस्कूल, राष्ट्रीय हरीत सेना, एनसीसी, अँग्लो हिंदी हायस्कूलचे विद्यार्थी उपस्थित होते.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी