तर… बँकांमधून शासकीय खाते स्थलांतरीत – जिल्हाधिकारी



v 20 टक्क्यांपेक्षा कमी पीक कर्जवाटप करणा-या बँकांना अल्टिमेटम
यवतमाळ, दि. 15 :  खरीप हंगामामध्ये पीक कर्जवाटप करण्याची काही बँकांची गती चांगली आहे तर काही बँका अतिशय संथगतीने कर्जवाटप करीत आहे. शेतक-यांना यावेळेस पीक कर्जाची गरज आहे. मात्र काही बँकांच्या आडमुडेपणामुळे शेतकरी कर्जापासून वंचित राहत आहे. ही अतिशय गंभीर बाब आहे. दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ज्या बँकांनी आतापर्यंत 20 टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केले असेल, अशा बँकामधील शासकीय खाते दुस-या बँकेत स्थलांतरीत करण्यात येतील, असा इशारा जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बँकर्सच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, निवासी उपजिल्हाधिकारी ललितकुमार व-हाडे, जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक विजयकुमार भगत आदी उपस्थित होते.
खरीप हंगाम हा शेतक-यांसाठी अतिशय महत्वाचा आहे, असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, जून अखेरपर्यंत 50 टक्के तर आजपावेतो  100पीक कर्जवाटप होणे अपेक्षित होते. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत 73 टक्के तर स्टेट बँक ऑफ इंडियाने 35 टक्के कर्जवाटप केले आहे. मात्र अजूनही जिल्ह्यातील काही बँका 20 टक्क्यांपेक्षा कमी आहे. जे पात्र सभासद आहेत, त्यांना आतापर्यंत 100 टक्के कर्जवाटप व्हायला पाहिजे होते. मात्र तसे झाले नाही. पात्र सभासदांच्या याद्या बँकेच्या शाखेनिहाय लावणे गरजेचे आहे. तसेच या याद्या त्वरीत तहसीलदारांकडेसुध्दा देण्यात याव्या. पुढील आठवड्यापर्यंत कर्जवाटपाची गती वेगाने न झाल्यास संबंधित बँकांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिका-यांनी दिला.
जिल्ह्यात 12 जुलैपर्यंत 1 लक्ष 36 हजार 910 पात्र सभासदांना 845 कोटी 75 लक्ष रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले आहे. ही आकडेवारी 39.12 टक्के आहे. दिलेल्या उद्दिष्टांपेक्षा 20 टक्क्यांच्या खाली कर्जवाटप करणा-या बँका सहा असून यात अहलाबाद बँक, बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॉर्पोरेशन बँक आणि पंजाब नॅशनल बँकेचा समावेश आहे.
०००००००

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी