पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिस अधिक्षक कार्यालयाच्या विस्तारीकरण इमारतीचे उद्घाटन


     


                           
यवतमाळ, दि. 13 : येथील जिल्हा पोलिस अधिक्षक कार्यालय परिसरात नव्याने बांधण्यात आलेल्या विस्तारीकरण इमारतीचे उद्घाटन पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुनील महेंद्रीकर, पोलिस उपअधिक्षक (गृह) अनिलसिंह गौतम, उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.पांडे, श्री. कोळी आदी उपस्थित होते.
सुरवातीला पालकमंत्री मदन येरावार यांच्या हस्ते नवीन इमारतीचे फित कापून उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलतांना पालकमंत्री म्हणाले, इमारतीचे बांधकाम चांगले करण्यात आले आहे. पळसावाडी येथील पोलिस कर्मचा-यांच्या निवास स्थानासाठी निधी देण्यात आला आहे. त्याचे काम त्वरीत करा. शहर पोलिस स्टेशनला स्मार्ट बनविण्याकरीता 10 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यासाठी खाजगी आर्किटेक्ट नेमण्यात आला असून पुढच्या महिन्यात या पोलिस स्टेशनच्या नुतणीकरणाचे काम सुरू झाले पाहिजे, अशा सुचना त्यांनी केल्या.
रस्ते सुरक्षा संदर्भात पोलिस विभाग, स्थानिक नगर पालिका आणि उपप्रादेशिक परिवहन विभाग यांची संयुक्त समिती आहे. या समितीने पुढाकार घेऊन रत्यांवरील वाहतुकीसंदर्भात नियमांचे फलक, हायलायटर, दुभाजके नागरिकांना स्पष्ट दिसतील अशा पध्दतीने लावणे गरजेचे आहे. सुरक्षा समितीचा अहवाल आल्याशिवाय या बाबींकरीता निधी देता येत नाही. त्यामुळे तिनही विभागांनी त्वरीत रस्त्यांची पाहणी करून अहवाल सादर करावा, अशा सुचना त्यांनी पोलिस अधिक्षकांना दिल्या.
तत्पूर्वी पालकमंत्र्यांनी नवीन इमारतीमध्ये बांधण्यात आलेल्या अपर पोलिस अधिक्षकांची कॅबिन, सायबर सेल, अंगुली मुद्रा विभाग, महिला सुरक्षा विशेष कक्ष आदींची पाहणी केली. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मरपल्लीकर, उपअभियंता प्रवीण कुळकर्णी, शाखा अभियंता आर.एम. क्षिरसागर, मुंगसाजी कन्स्ट्रक्शनचे कंत्राटदार यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
सदर इमारत ही मुंगसाजी कन्स्ट्रक्शनने सहा महिन्यात पूर्ण केली असून यासाठी 1 कोटी 13 लक्ष रुपये खर्च आला आहे. या इमारतीमध्ये तळमजल्यावर तीन व पहिल्या माळ्यावर तीन खोल्या असून सुसज्ज फर्निचरचे नियोजन आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी