बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेसाठी ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ उपक्रम



v जिल्हाधिका-यांनी घेतली बैठक
यवतमाळ, दि. 6 : गावागावातील महिला बचत शासन गटांना विविध माध्यमातून प्रोत्साहन देत आहे. या बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनेसाठी आता ‘हिरकणी नवउद्योजक महाराष्ट्राची’ ही योजना मंजूर करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत महिला बचत गटांच्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना प्रोत्साहीत करण्यासाठी मार्गदर्शन करणे, तालुका व जिल्हा स्तरावर मंच उपलब्ध करून देणे तसेच उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांना पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी अर्थसहाय्य करणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे.
या संदर्भात जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, पोलिस उपअधिक्षक (गृह) अनिलसिंह गौतम, कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. प्रमोद यादगिरवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बाळासाहेब चव्हाण, अमरावती विद्यापिठाचे डॉ. डी.टी. इंगोले, महिला आर्थिक विकास महामंडळाचे डॉ. रंजन वानखेडे यांच्यासह तहसीलदार आदी उपस्थित होते.
यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, या उपक्रमाच्या माध्यमातून अनेक बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पना समोर येतील. तालुका स्तरावर गठीत करण्यात आलेल्या समितीचे तहसीलदार हे अध्यक्ष आहेत. आपल्या तालुक्यातील बचत गटांच्या नाविण्यपूर्ण संकल्पनांसाठी तहसीलदारांनी पुढकार घ्यावा तसेच त्यांना प्रोत्साहित करावे, असे त्यांनी सांगितले.  
राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान आणि राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान अंतर्गत किमान एक वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेले व राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानातील पंचसुत्रीचे पालन करणारे महिला बचत गट हे या योजनेचे लाभार्थी असतील. सदर योजनेंतर्गत महिला बचत गटांना त्यांच्या नाविन्यपूर्ण संकल्पना प्रदर्शित करण्यासाठी तालुका स्तरावर मंच उपलब्ध करून देण्यात येईल. याकरीता महिला बचत गटांनी सहाय्यक गटविकास अधिकारी तथा सदस्य सचिव यांच्याकडे दिनांक 15 जुलै 2019 पर्यंत अर्ज सादर करावा.
अर्जासोबत बचत गटाचा ठराव, नाविन्यपूर्ण प्रकल्प सुरु असल्यास अथवा सुरु करावयाचा असल्यास त्याबाबतची परिपूर्ण माहिती, फोटो, प्रकल्पासाठी येणारा खर्च, त्याची उपयुक्तता व त्यामुळे किती महिलांना रोजगार प्राप्त होत आहे, तसेच तयार होणाऱ्या मालाकरीता, विक्री करण्यासाठी बाजारपेठ उपलब्ध आहे किंवा कसे याबाबतच्या परिपूर्ण माहितीसह प्रस्ताव सादर करावा. सदर संकल्पनांचे तालुकास्तरीय समितीद्वारे परिक्षण करण्यात येईल. परिक्षणाअंती निवडयोग्य ठरलेल्या उत्कृष्ट नाविन्यपूर्ण संकल्पनांची 10 च्या मर्यादेत निवड करण्यात येईल. निवड केलेल्या उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्ष साकार करण्यासाठी आवश्यक पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास 50 हजार रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य करण्यात येईल.
तालुका स्तरावर निवड झालेल्या नाविन्यपूर्ण संकल्पनांना जिल्हा स्तरावर सादरीकरणासाठी संधी देण्यात येईल. जिल्हास्तरीय मंचावरील नाविन्यपूर्ण संकल्पनांचे आमंत्रितांद्वारे व जिल्हा नाविन्यता परिषदेद्वारे परिक्षण करण्यात येईल. परिक्षणाअंती 10 च्या मर्यादेत नाविन्यपूर्ण संकल्पनांची निवड करण्यात येईल. सदर उत्कृष्ट संकल्पना प्रत्यक्षात साकारण्यासाठी आवश्यक पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी प्रत्येक प्रकल्पास 2 लक्ष रुपयांच्या मर्यादेत अर्थसहाय्य देण्यात येईल. याकरीता लाभार्थी बचत गटांनी सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी