जिल्ह्यात वृक्ष लागवड मोहिमेचा शुभारंभ





यवतमाळ, दि. 1 : यावर्षी शासनाच्या 33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेंतर्गत जिल्ह्यात ढुमणापूर येथील बांबू व चंदन उद्यानात वृक्ष लागवड करून मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे तर प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्षा कांचन चौधरी, जि.प. सदस्या रेणु शिंदे, मुख्य वनसंरक्षक आर. के. वानखेडे, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे आदी उपस्थित होते.
 यावेळी बोलतांना जि.प. अध्यक्षा म्हणाल्या, आज हरीतक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती आहे. त्यांचे वृक्षप्रेम सर्वश्रृत होते. शासनाने सुरू केलेली वृक्ष लागवड मोहिम लोकचळवळ होणे आवश्यक आहे. निसर्गाचा असमतोल, पाण्याचे दुर्भिक्ष आदी संकटे वृक्षतोडीमुळे आली आहेत. त्यामुळे वृक्षांची लागवड आणि त्याचे संगोपन करणे गरजेचे आहे. जीवसृष्टीसाठी प्रत्येक समाज घटकाने समोर यावे. केवळ एक दिवस झाडे लावू नका ही मोहीम निरंतर सुरू ठेवा, असे आवाहन त्यांनी केले.
जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, राज्यात शासनाने चार वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड मोहीम हाती घेतली आहे. त्याअंतर्गत यावर्षीच्या 33 कोटी मोहिमेदरम्यान जिल्ह्याला 30 सप्टेंबरपर्यंत 1 कोटी 37 लक्ष 11 हजार 850 वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. ही केवळ शासकीय योजना नाही तर समाजातील प्रत्येकाने यासाठी सहकार्य करावे. संतांनी आणि आपल्या पुर्वजांनी वृक्ष संवर्धनाचे महत्व समाजाला पटवून दिले आहे. वृक्ष संवर्धनाचा हा दिवा सतत तेवत ठेवून वृक्षलागवडीचा संदेश सर्वांपर्यंत पोहचवा,असे त्यांनी सांगितले.
यावेळी नगराध्यक्षा कांचन चौधरी म्हणाल्या, वृक्षतोडीचा मानवी जीवनावर झालेला परिणाम पाणीटंचाईच्या माध्यमातून यवतमाळकरांनी अनुभवला आहे. त्यामुळे दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त व्यापक स्वरुपात ही मोहीम राबवावी. तसेच वृक्ष लागवड मोहिमेचे नियोजन करतांना प्रशासनाने सर्व पदाधिकारी, सामाजिक संघटनांना याची माहिती द्यावी, असेही त्या म्हणाल्या. यावेळी मुख्य वनसंरक्षक आर. बी. वानखेडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा आणि राजन टांगो यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते बांबुंच्या झाडांची लागवड करण्यात आली. तत्पूर्वी उत्तर आर्णि वनपरिक्षेत्रांतर्गत असलेली सातारा संयुक्त वनव्यवस्थापन समिती, जोडमोहा वनपरिक्षेत्रांतर्गत असलेली तासलोट संयुक्त वनव्यवस्थापन समिती आणि पुसद वनपरिक्षेत्र अंतर्गत असलेल्या वडगाव संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आणि सचिवांचा सत्कार करण्यात आला. वृक्षपुजनाने कार्यक्रमाची सुरूवात झाली. यावेळी केंद्रीय विद्यालयाची इयत्ता दहावीची विद्यार्थीनी शुभलक्ष्मी कुलकर्णी हिने वृक्षावर आधारीत गीत सादर केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे म्हणाले, देशात 23 टक्के, राज्यात 19 टक्के तर आपल्या जिल्ह्यात 16 टक्के वनक्षेत्र आहे. गत दोन वर्षात वनविभागाच्या वतीने जांब पार्क येथे सर्वधर्मसमभाव वने, ऑक्सीजन पार्क येथे एकाच वेळी पाच हजार वृक्षांची लागवड असे उपक्रम राबविण्यात आले आहे. जिल्ह्यात 113 रोपवाटिका असून 1.35 रोपे उपलब्ध आहे, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे संचालन वनरक्षक प्रांजली दांडगे यांनी तर आभार सहाय्यक वनसंरक्षक आर.व्ही. गौपाल यांनी मानले. कार्यक्रमाला प्रतिसाद फाऊंडेशन, गो-ग्रीन फाऊंडेशन, संकल्प संस्था, प्रयास संस्था, कोब्रा ॲडव्हेंचर यांच्यासह अनेक सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, वनविभागाचे अधिकारी व विविध शाळांचे विद्यार्थी उपस्थित होते.*******

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी