नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पासंदर्भात पालकमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक




यवतमाळ, दि. 29 : राज्यातील शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यात शेतक-यांना पुरक व्यवसायाची जोड मिळावी, या उद्देशाने राज्य शासनाने नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना कार्यान्वित केली आहे. या अंतर्गत यवतमाळ जिल्ह्यात कृषी विभागाने केलेल्या अंमलबजावणीच्या कामाचा आढावा पालकमंत्री मदन येरावार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला. बैठकीला जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत (पोक्रा) जिल्ह्यात कृषी विभागाने त्वरीत कामे हाती घ्यावी, असे सांगून पालकमंत्री मदन येरावार म्हणाले,या योजनेतील लाभार्थ्यांना कर्जासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेशी संलग्न करून देण्यात येईल. येत्या आठ दिवसात कृषी सहाय्यकांमार्फत लाभार्थ्यांच्या याद्या जिल्हा भुजल सर्वेक्षण विभागाकडे द्याव्यात. याअंतर्गत केवळ धडक सिंचन विहिरींचाच लाभ नाही तर शेतक-यांना इतरही योजनेचा लाभ द्यावा. शेतक-यांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी ही योजना असल्यामुळे कृषी विभागाने या विषयाकडे गांभिर्याने लक्ष द्यावे. तसेच हा विषय प्राधान्यावर ठेवण्याच्या सुचना पालकमंत्र्यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेंतर्गत शेतकरी गट निर्माण करणे, बँकेकडून कर्ज उचलणे, खरेदी प्रक्रिया राबविणे यासाठी कृषी विभागाने कालबध्द कार्यक्रम निश्चित करावा. बैठकीत घेण्यात आलेले निर्णय योग्यरित्या राबवावे, असे निर्देश जिल्हाधिका-यांनी दिले.
हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास शेतक-यांना सक्षम करणे आणि शेतीव्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे, यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यात यवतमाळ जिल्ह्यातील 309 गावांचा समावेश असून त्याची एकूण 23 गावसमुहामध्ये विभागणी करण्यात आली आहे. प्रथम टप्प्यात 76 गावे (5 गाव समुह), द्वितीय टप्प्यात 195 गावे (12 गाव समुह) आणि तिस-या टप्प्यात 38 गावांचा (6 गाव समुह) यात समावेश आहे.
०००००००


  


   

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी