प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा - आदिवासी विकास मंत्री डॉ. उईके





यवतमाळ, दि. 5 : राज्याचे मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्या अभिनव संकल्पनेतून साकारलेली वृक्ष लागवड मोहीम आज लोकचळवळ झाली आहे. पर्यावरणाच्या संरक्षणासाठी चार वर्षांत राज्यात 50 कोटी वृक्ष लागवडीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. भविष्यासाठी वृक्ष लागवड ही काळाची गरज असल्यामुळे यात प्रत्येकाचे योगदान आवश्यक आहे. आपण ज्या गावात जन्मलो, खेळलो त्या गावाचे नाव वृक्ष लागवड मोहिमेत अग्रक्रमावर असले पाहिजे. त्यामुळे प्रत्येक गावाने वृक्ष लागवडीचा संकल्प करावा, असे आवाहन आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी केले.
कळंब तालुक्यातील जोडमोहा वनपरिक्षेत्रात असलेल्या वन विभागाच्या डेपोमध्ये वृक्ष लागवडीचा शुभांरभ करतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जोडमोहाचे सरपंच ज्ञानेश्वर डहारे तर मंचावर मुख्य वनसरंक्षक आर. के. वानखेडे, यवतमाळचे उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे, तहसीलदार सुनील पाटील, गटविकास अधिकारी सुशील संसारे आदी उपस्थित होते.
वन विभागाने आनंद वृक्ष, स्मृती वृक्ष, माहेरची झाडी आदी उपक्रम सुरू केल्याचे सांगून डॉ. अशोक उईके म्हणाले, वृक्ष लागवडीसंदर्भात पुणे जिल्ह्यातील रानमाळा या गावाचे नाव सर्वत्र घेतले जाते. वृक्ष लागवडीकरीता लोकांना प्रेरीत करण्यासाठी वरील संकल्पना या गावाने राबविल्या. त्यांचा हा संकल्प आपणही अंगिकारावा. आपल्या गावाचे नाव या मोहिमेच्या यशस्वीतेत कसे येईल, याचा विचार प्रत्येकाने करावा. वृक्ष लागवड ही काळाची गरज आहे. आज जर आपण काळजी घेतली नाही तर भविष्यात गंभीर आणि वाईट परिस्थितीचा सामना करावा लागेल. त्यामुळे केवळ शासन आणि प्रशासनाची ही मोहीम नाही. तर प्रत्येक नागरिक, सामाजिक संघटनांचा यात सहभाग आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.
शासनाचे सर्व विभाग यात सहभागी होत आहे. बांधकाम विभागही आता झाडे लावायला लागला आहे, हे सुचिन्ह म्हणावे लागेल. झाडे लावून त्याचे संवर्धन होणे आवश्यक आहे. आपण लावलेल्या झाडांची नियमितपणे पाहणी करा. लोकसहभागाचा हाच अर्थ या मोहिमेत अपेक्षित आहे. वृक्ष लागवडीची ही मोहीम तीन महिने सुरू राहणार आहे. कळंब तालुक्याला दिलेले उद्दिष्ट नक्कीच सर्वांच्या सहकार्याने पूर्ण होईल, असेही ते म्हणाले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जोडमोहाचे सरपंच ज्ञानेश्वर डहारे आणि मुख्य वनसंरक्षक वानखेडे यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाची सुरूवात वृक्ष पुजनाने व दीप प्रज्वलनाने झाली. तत्पूर्वी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते वन विभागाच्या डेपो परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.
33 कोटी वृक्ष लागवड मोहिमेत जिल्ह्याला 1 कोटी 37 लक्ष 11 हजार 850 चे उद्दीष्ट आहे. यात कळंब तालुक्यात 5 लक्ष 20 हजार 382 वृक्षांची लागवड करावयाची आहे. जोडमोहा वनपरिक्षेत्रात 13098 हेक्टर वनक्षेत्र असून यावर्षी 115 हेक्टरवर 1 लक्ष 26 हजार 500 झाडे लावायची आहेत. यासाठी विठ्ठलवाडी व दत्तापूर येथील रोप वाटिकांमधून रोपांचा पुरवठा करण्यात येईल.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपवनसंरक्षक डॉ. भानुदास पिंगळे यांनी केले. संचालन वनरक्षक प्रांजली दांडगे यांनी तर आभार सहाय्यक वनसंरक्षक आर.व्ही. गौपाल यांनी मानले. कार्यक्रमाला सुरेश केवटे, कृष्णा भोयर, कैलास बोंदरे, मनोज काळे, नंदू डहारे, विलास मेश्राम, नरेश राठोड, नामदेव लेंडे, निश्चल ठाकरे, मनिषा काटे यांच्यासह वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तसेच शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.


Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी