किटकनाशके खरेदी करतांना व वापरतांना सुरक्षाविषयक काळजी घ्या


v कृषी विभागाचे शेतकऱ्यांना आवाहन
यवतमाळ, दि. 8 : शेतकऱ्यांनी किटकनाशके खरेदी करतांना व ती वापरताना सुरक्षाविषयक काळजी घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. शेतक-यांनी कायदेशीर परवाना असणाऱ्या नोंदणीकृत किटकनाशक डीलरकडून किटकनाशके, जैवकिटकनाशके खरेदी करावे. दिलेल्या भागात वापरण्यासाठी एक वेळ पुरेल ऐवढेच किटकनाशके खरेदी करा. किटकनाशकाच्या पॅकवर, डब्यावर मान्यतेची लेबल्स नीट पाहून घ्या, आवरणावरील बॅच क्रमांक, नोंदणी क्रमांक, उत्पादनाची तारीख, अंतीम मुदत इत्यादी बाबी तपासणे आवश्यक आहे.
डब्यात व्यवस्थीत पॅक केलेली किटकनाशके खरेदी करावीत. रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या किंवा कायदेशिर परवाना नसणाऱ्या व्यक्तीकडून किटकनाशके खरेदी करू नका. संपर्ण हंगामासाठी मोठ्या प्रमाणात किटकनाशक खरेदी करू नका. ज्या डब्यातून, पॅकमधून गळती होत असेल, डब्याचे, पॅकचे आवरण सैल झाले असेल किंवा सिलबंध नसेल तर अशी किटकनाशके खरेदी करू नका. किटकनाशके वापरतांना घराच्या आवारापासून दूर ठेवा. किटकनाशके त्यांच्या मूळच्या डब्यातच साठवून ठेवा. किटकनाशके आणि तणनाशके वेगवेगळी साठवून ठेवणे गरजेचे आहे. जेथे किटकनाशके साठवली असतील तेथे ध्योक्याचा इशारा निर्देश लावून ठेवा. किटकनाशके लहान मुले आणि इतर पाळीव प्राणी यांच्यापासून दूर साठवून ठेवावीत तसेच साठवणीची जागा थेट ऊन आणि पाऊस यांच्यापासून सुरक्षित असावी.
गळणारी किंवा दोष असणारी साधणे वापरू नका. दोष असणाऱ्या, मान्यता नसणाऱ्या नोझल वापरू नका. चोंदलेली नोझल्स तोंडाने साफ करू नका. त्याऐवजी फवारणी यंत्राबरोबर असणारे ब्रश वापरा, कधीही किटकनाशके आणि तणनाशकांसाठी एकच फवारणी यंत्र वापरू नका. मोठ्या प्रमाणात असणारी किटकनाशके कधीही डोक्यावरून, खांद्यावरून किंवा पाठीवरून वाहून नेऊ नका. फवारणी द्रावण तयार करतांना नेहमी स्वच्छ पाणी, संरक्षक कपडे, हातमोजे, चेहऱ्याचा मास्क, डोळ्यावर चष्मा, टोपी, ॲप्रन, पूर्ण विजार, पायात गमबुट इत्यादी वापरावे जेणेकरून पूर्ण शरीर झाकले जाईल. नाक, डोळे, डोके, कान, हात, त्वचा व शरिराच्या अवयवांना किटकनाशकाचा स्पर्श होणार नाही, याची काळजी घ्या.
किटकनाशकाच्या डब्यावर लिहिलेले निर्देश वापरण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचा व समजून घ्या. गरजेपूरतेच द्रावण तयार करा. फवारणीची टाकी भरतांना किटकनाशक आजूबाजूला सांडणार नाही याची दक्षता घ्यावी. दिलेल्या प्रमाणातच किटकनाशके वापरा, जीवाला धोका निर्माण होईल अशी कोणतीही कृती करू नका. फवारणीच्या टाकीचा कधीही वास घेवू नका. जास्त प्रमाणात किटकनाशके वापरू नका,. त्यामुळे पिकांना आणि पर्यावरणाला धोका निर्माण होतो. किटकनाशकाचे काम पूर्ण होईपर्यंत काहीही खाऊपीऊ नका तसेच धुम्रपान करू नका किंवा काहीही चघळू नये. तसेच नशा किंवा मद्य प्राशन करू नका.
फवारणीकरीता तज्ञांनी सांगितलेले प्रमाण आणि द्रावण वापरा. शांत आणि थंड दिवशी फवारणी करावी. साधारणत: व्यवस्थित उजेड असलेल्या दिवशी फवारणी करा. प्रत्येक फवारणीसाठी आवश्यक ते फवारणी यंत्र वापरा. फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी. फवारणी झाल्यानंतर उपकरणे आणि बादल्या स्वच्छ पाणी आणि साबून वापरून धुवावीत. फवारणी झाल्यानंतर लगेचच कोणीही पाळीव प्राण्याला, व्यक्तीला शेतात जाऊ देऊ नये. फवारणी झालेल्या शेतात धोक्याचा ईशारा दर्शक फलक लावावा.
फवारणीनंतर  राहिलेल्या द्रावणाची सुरक्षित ठिकाणी (उदा. पडीक, निर्मनुष्य क्षेत्र) विल्हेवाट लावा. वापरलेले, रिकामे डबे दगड, काठीच्या साहाय्याने चेपा आणि त्यांना दूर निर्मनुष्य ठिकाणी आजूबाजूला पाण्याचा स्त्रोत नसलेल्या ठिकाणी खोल मातीमध्ये पुरुन टाकावे. विषबाधा झाल्याची लक्षणे दिसू लागल्यास प्रथमोपचार करा आणि रुग्णाला त्वरीत डॉक्टरांकडे घेऊन जा. डॉक्टरांना रिकामा डबादेखील दाखवा. फवारणीशी निगडीत व्यक्तींनी आपली आरोग्य तपासणी करून घ्यावी. वैद्यकीयदृष्ट्या पात्र असल्यास संपूर्ण काळजी व उपाययोजनेसह सुरक्षित फवारणी करावी.
अधिक माहितीसाठी शेतक-यांनी कृषी सहाय्यक, कृषी पर्यवेक्षक, मंडळ कृषी अधिकारी, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी व कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र, कृषी विद्यापिठकाचे तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, डॉक्टर यांचेशी संपर्क साधावा, असे आवाहन उपविभागीय कृषी अधिकारी कैलास वानखेडे यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी