संवाद पर्वच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कौशल्‍य विकासाबाबत मार्गदर्शन

यवतमाळ, दि. 1 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सुचनेनुसार जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवाद पर्व कार्यक्रमात विद्यार्थ्यांना कौशल्य विकास व उद्योजकता याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
जिल्हा ग्रंथालय येथे आयोजित कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे  सहायक संचालक पी. जी. हरडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने, जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर उपस्थित होते.
यावेळी बोलतांना हरडे म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी कौशल्य विकास विभागाच्या अनेक योजना आहेत. बेरोजगार युवकांची नोंदणी ऑनलाईन केली जाते. तसेच सर्व सेवा ह्या ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यासाठी mahaswayam हे पोर्टल सुरु करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांनी कौशल्य विकासासंदर्भात तांत्रिक शिक्षण घेणे आज गरज झाली आहे. खाजगी क्षेत्रात तांत्रिक शिक्षण आणि अनुभवाच्या आधारावर आपल्याला रोजगार मिळू शकतो. त्यासाठी कौशल्य विकास विभागातर्फे अनेक छोटे-छोटे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. यात मॉडेल डिझायनिंग, कृषी, ब्युटी पार्लर, गारमेंट मॅन्युफॅक्चरींग, हॉटेल व्यवसाय, संगणक प्रशिक्षण, होम डिझायनिंग आदींचा समावेश आहे. विशेष म्हणजे हे सर्व अभ्यासक्रम शासनाच्यावतीने मोफत आहे. बाहेर याच अभ्यासक्रमाचे शुक्ल 5 ते 10 हजारांपर्यंत आहे.
शासकीय नोकरीसाठी स्पर्धा परीक्षा हा आज एकमेव मार्ग आहे. यात यश आले तर उत्तमच. मात्र सर्वांनाच संधी मिळेल याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत स्पर्धा परिक्षेसोबतच कौशल्य विकासाचे प्रशिक्षण आपल्या हाती असले तर आपण छोटा-मोठा रोजगार मिळवू शकतो. विशेष म्हणजे शिक्षण घेत असलेले आणि शाळा सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठीसुध्दा अभ्यासक्रम चालविले जातात. कौशल्य विकासामध्ये थेअरीपेक्षा अनुभवाला जास्त महत्व आहे. जे अभ्यासात हुशार नसतात ते कदाचित एखाद्या कौशल्याच्या भरोश्यावर रोजगार मिळवून आपला उदरनिर्वाह चालवण्याची उदाहरहणे आपल्याकडे भरपूर आहेत. केवळ अभ्यासक्रम आणि प्रशिक्षण देऊनच नाही तर नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी या विभागामार्फत प्रयत्न केले जातात. जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित संवाद पर्व हा कार्यक्रम कौतुकास्पद आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती नागरिकांना मिळते, असेही ते म्हणाले. यावेळी मी मुख्यमंत्री बोलतोय या मुख्यमंत्र्यांच्या पुस्तिकेचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांनी तर आभार जिल्हा ग्रंथपाल नितीन सोनोने यांनी मानले.  यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी – विद्यार्थीनी उपस्थित होते.     


                                                      0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी