यवतमाळ उद्योग नगरी म्हणून उदयास येईल - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 29 : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पायाभुत सुविधांची कामे सुरू आहे. दोन-दोन राष्ट्रीय महामार्गासोबत जिल्ह्याला लागून जाणा-या समृध्दी मार्गामुळे रस्त्यांचे जाळे विस्तारत आहे. रस्त्यांचा हा हब असून येथे विकसीत होणा-या टेक्सटाईल पार्कमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुंतवणूकदार येतील. त्यामुळे भविष्यात यवतमाळ ही उद्योग नगरी म्हणून उदयास येईल, असा विश्वास पालकमंत्री मदन येरावार यांनी व्यक्त केला.
यवतमाळ येथील महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातर्फे औद्योगिक क्षेत्रात आयोजित टेक्सटाईल पार्कच्या जलवाहिनी व इतर पायाभूत सुविधांच्या भुमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर अमरावती औद्यागिक विकास विभागाचे कार्यकारी अभियंता जे.व्ही. कांगणे, एमआयडीसीचे क्षेत्र व्यवस्थापक डी.डी.पारधी, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदलाल सुराणा, रेमंड युको डेनीमचे व्यवस्थापक नितीन श्रीवास्तव, जिल्हा उद्योग केंद्राचे व्यवस्थापक दयाल चव्हाण, उपअभियंता हेमंत कुलकर्णी उपस्थित होते.
जिल्ह्यात टेक्साटाईल पार्कसाठी अनेक दिवसांपासून पाठपुरावा केल्याचे सांगून पालकमंत्री येरावार म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाच्या दृष्टीने आज अतिशय महत्वाचा दिवस आहे. ख-या अर्थाने जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर येथे उत्पादीत मालावर प्रक्रिया उद्योग असणे गरजेचे आहे. जिल्ह्यात 9 लक्ष हेक्टरवर कापसाचे उत्पादन होते. त्यामुळे टेक्सटाईल पार्क हा जिल्ह्यासाठी बुस्ट ठरू शकतो. जिल्ह्यातील सर्व पायाभूत सुविधांना मंजूरी देण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासाठी शासनाने 100 कोटींचे वीजेसाठी पॅकेज दिले आहे. जिल्ह्यात 132 के.व्ही.चे सब स्टेशन होत असून उद्योग क्षेत्रासाठी 11 के.व्ही चा विस्तार करण्यात आला आहे. वर्धा-नांदेड रेल्वेमार्गाला शासनाने तात्काळ 40 टक्के रक्कम उपलब्ध करून दिली आहे. जिल्ह्यात उद्योग निर्माण होणे, शेतक-यांच्या मालाला भाव मिळणे, रोजगार निर्माण होणे ही काळाची गरज आहे. एमआयडीसीसंदर्भात काही अडचणी असल्यास शासनस्तरावर त्याचा पाठपुरावा करून त्या नक्कीच सोडविल्या जातील, असे पालकमंत्री म्हणाले.
येथील टेक्सटाईल पार्क जवळपास 95 हेक्टरवर उभा राहत आहे. टेक्सटाईल पार्कमध्ये 2.30 किमीचे रस्ते, 2.30 किमीची पाईप लाईन, 3 एमएलडीवर आधारीत सांडपाणी प्रक्रिया, 3 किमीची ड्रेनेज लाईन विकसीत होणार आहे. सी-झोनचे काम सुरू असून येत्या दोन वर्षात येथे उद्योग सुरु होईल, असे प्रास्ताविक करतांना कार्यकारी अभियंता कांगणे यांनी सांगितले. यावेळी रेमंडचे नितीन श्रीवास्तव आणि नंदलाल सुराणा यांनीसुध्दा मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाला उद्योजक, कंत्राटदार आणि एमआयडीचे अधिकारी उपस्थित होते.
                                                000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी