राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे भुसंपादन संदर्भात अडचणी दूर करा - पालकमंत्री मदन येरावार

यवतमाळ, दि. 13 : जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग आणि वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे प्रकल्प हे राज्य शासनाच्या वॉररुम मधील विषय आहेत. या दोन्ही संदर्भात जमिनीचे भुसंपादन आणि नागरिकांना मिळणारा मोबदला याबाबत काही अडचणी असल्यास त्या त्वरीत दूर करा, अशा सुचना पालकमंत्री मदन येरावार यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग व रेल्वे भुसंपादनाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) चंद्रकांत जाजू, उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे, अपार, नितीनकुमार हिंगोले, कापडनीस उपस्थित होते.
वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग सुरवातीला 625 कोटी रुपयांचा होता. वर्षानुवर्षे रखडलेल्या या प्रकल्पाची किंमत आता 2500 कोटींवर गेली आहे. मात्र राज्यात नवीन सरकार आल्यानंतर राज्य सरकारने आपल्या हिश्याची 40 टक्के रक्कम म्हणजे 1 हजार कोटी रुपये या प्रकल्पासाठी त्वरीत उपलब्ध करून दिले आहे. जिल्ह्यातून दोन राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे जात आहे. यवतमाळच्या विकासासाठी ही सुवर्ण संधी आहे. त्यामुळे अडलेल्या गोष्टीवर त्वरीत तोडगा काढून त्या निकाली काढाव्यात. दोन्ही प्रकल्पासाठी भुसंपादनाचे दिलेले उद्दिष्ट गाठण्यासाठी अधिका-यांनी विशेष लक्ष द्यावे. प्रशासनाने हे दोन्ही प्रकल्प मिशन मोडवर घेऊन कामाची प्रगती काय आहे, यासंदर्भात आठवड्यातून एकदा त्याचा आढावा घ्यावा, अशा सुचना पालकमंत्री येरावार यांनी दिल्या.
यावेळी त्यांनी घोषित झालेल्या जमिनीबाबतची गावनिहाय माहिती, जमीन मोजणीविषयक सद्यस्थिती, ठराविक वेळेत कराव्या लागणा-या कामाचे नियोजन यांच्यासह कर्जमाफीसाठी नोंदणी, आधार लिंकिंग आदी बाबींचा आढावा घेतला.
बैठकीला उपविभागीय अधिकारी, रेल्वेचे अधिकारी आदी उपस्थित होते.
                                                    000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी