ग्रामीण भागाच्या प्रगतीनेच देश सशक्त होईल - पालकमंत्री मदन येरावार


यवतमाळ, दि. 17 : खेड्यांकडे चला हा संदेश आपल्याला महात्मा गांधी यांनी दिला होता. खरा भारत हा ग्रामीण भागात आहे, असे त्यांचे म्हणणे होते. आपण सर्व रोजगारक्षम आहोत. या क्षमेतेचा उपयोग करून आपले कुटुंब गतिमान करणे गरजेचे आहे. त्यासाठी शासनाच्या विविध योजना आहेत. या योजनांचा लाभ घेतला तर आपले उत्पन्न वाढेल. त्यातून जीवनमान उंचावेल. कुटुंबासोबतच गावाची, राज्याची आणि देशाची प्रगती होईल. त्यामुळे सशक्त आणि विकसनशील होण्यासाठी ग्रामीण भागाची प्रगती होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
लोहारा केंद्रातंर्गत येणा-या भोयर येथे व्यावसायिक व सक्षमीकरण प्रबोधन तसेच ग्रामरक्षक दल युवकांसाठी आयोजित मार्गदर्शन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर गावच्या सरपंचा यशोदा लुंगसे, ग्रामीण पोलिस स्टेशनचे ठाणेदार डहाके, सहाय्यक वनसंरक्षक गिरीजा देसाई उपस्थित होत्या.
गावात ग्रामरक्षक दलाची स्थापना, महिला बचत गटांना मार्गदर्शन, महिला सक्षमीकरणासाठी पुढाकार घेतल्याबद्दल गावक-यांचे अभिनंदन करून पालकमंत्री येरावार म्हणाले, महिला सक्षमीकरणाची ज्योत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी सर्वप्रथम पेटविली. भारतीची पहिली अंतराळवीर, भारताच्या माजी राष्ट्रपती, माजी पंतप्रधान, सद्यस्थितीत भारताच्या परराष्ट्रमंत्री, संरक्षण मंत्री या महिला आहेत. एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के असलेल्या महिला शिक्षित आणि सुदृढ होत नाही तोपर्यंत हा समाज पुढे जाणार नाही. ग्रामीण भागासाठी शासनाच्या अनेक योजना आहेत. महिला बचत गटांना शुन्य टक्के दराने व्याज, कौशल्य विकासाचे प्रशिक्षण, कुक्कुटपालन, दुग्धव्यवसाय यांचा उपयोग केला तर आपण नक्कीच प्रगती करू शकतो. सुरवातीला गावात 12 बलुतेदार पध्दती होती. आता ती लोप पावली आहेत. आज छोट्या छोट्या कामाकरीता आपण शहराकडे धाव घेतो. कौशल्याची अनेक कामे जर युवक-युवतींनी शिकून घेतली तर त्यांना रोजगार उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी प्रशिक्षण देण्याची सोय आहे. या सर्व योजना जनतेपर्यंत पोहचणे गरजेचे आहे.
आज यवतमाळ येथे 10 कोटी रुपये खर्च करून वनउद्यान साकारण्यात येत आहे. यवतमाळचा समावेश राष्ट्रीय दुग्धविकास बोर्डामध्ये झाला असून दुग्धव्यवसायाला आपल्याकडे मोठी चालना आहे. गाय, म्हैस मिळण्यासाठी शासनाची योजना आहे. त्यांची देखभाल करून त्यापासून मिळणारे दूध आपण दिनशॉ, वारणा आदी कंपन्यांना देऊ शकतो. त्यासाठी त्यांच्यासोबत करार करण्यात आले आहेत. प्रधान, सगुणा सारख्या कंपन्या कुक्कुटपालनासाठी काम करीत आहे. कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून आपल्याला रोजगार उपलब्ध होईल. जिल्ह्यात कापूस, सोयाबीन, खनीज संपत्ती आहे. यावर प्रक्रिया करणारे केंद्र स्थापण्याचा सरकारचा मानस आहे. टेक्सटाईल पार्क, समृध्दी महामार्ग आदी पायाभुत सुविधांमुळे जिल्ह्याचा विकास होणार आहे. केंद्र आणि राज्यात विकास करणारे सरकार आहे. शेवटच्या माणसापर्यंत विकास गतीमान आणि पारदर्शकपणे पोहचविण्यासाठी हे सरकार कटिबध्द आहे. युवकांनी व्यसनापासून दूर राहून मुद्रा बँक, कौशल्य विकास आदींबाबत माहिती जाणून घ्यावी. शिक्षण हे व्यवसायपूरक असले पाहिजे. सक्षम ग्रामपंचायतींच्या माध्यमातून जिल्ह्याचा, राज्याचा आणि देशाचा विकास होणार आहे. त्यासाठी सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री येरावार यांनी केले.
तत्पूर्वी गावात स्थापन करण्यात आलेल्या ग्रामरक्षक दलाच्या फलकाचे अनावरण पालकमंत्र्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक  लक्ष्मण पेंदाम यांनी केले. संचालन व आभार कैलास राऊत यांनी मानले. यावेळी तंटामुक्ती समिती अध्यक्ष मनोहर सखरापुरे, उपसरपंच उमा चांदेकर, ग्रामरक्षक दलाचे अध्यक्ष रुपेश सहारे, उपाध्यक्ष श्रावण रेंगापुरे, सचिव गोपाल चौधरी यांच्यासह महिला बचत गटाच्या सदस्या, शाळेतील शिक्षक, वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                            0000000000  

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी