कृषी सोबत सर्वच विषय प्राधान्याने हाताळणार

डॉ. राजेश देशमुख यांनी स्वीकारला जिल्हाधिकारी पदाचा पदभार
यवतमाळ, दि. 11 : सामान्य माणूस हा केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व योजनांची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल. शेतकरी आणि कृषी हा विषय सर्वोच्च स्थानी असला तरी जिल्ह्यातील सर्व विषयाला आपले प्राधान्य राहील, असे जिल्ह्याचे नुतन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी  कार्यालयात आज (दि.11) डॉ. देशमुख यांनी जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. प्रशासनातील सर्व विभागाचा समन्वय ठेवून महसूल प्रशासन लोकाभिमुख आणि संवेदनशील करणे, हा मुख्य हेतू आहे. जिल्ह्यातील सर्वच विषय महत्वाचे आहेत. लोकांच्या समस्या तातडीने सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे ते म्हणाले. यावेळी अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, उपजिल्हाधिकारी चंद्रकांत जाजू, जिल्हा पुरवठा अधिकारी एस.बी. भराडी, राष्ट्रीय सुचना व माहिती केंद्राचे (एनआयसी) राजेश देवते, उपजिल्हाधिकारी महाजन आदी उपस्थित होते.
सातारा येथील जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून डॉ. राजेश देशमुख यांची यवतमाळच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे. 1992 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांची उपजिल्हाधिकारी या पदाकरीता निवड झाली. जुन 1993 मध्ये बीड येथे परिवेक्षाधीन उपजिल्हाधिकारी म्हणून ते शासन सेवेत रुजू झाले. यानंतर बीड येथे उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी, नांदेड येथे जिल्हा पुरवठा अधिकारी, लातूर येथे निवासी उपजिल्हाधिकारी, विविध मंत्र्यांचे खाजगी सचिव म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली.
सातारा येथे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी स्वच्छ भारत मिशन, स्वच्छता दर्पण, ग्रामीण घरकुल योजना, जलस्वराज्य, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोनती अभियान, ग्रामपंचायत विकास आराखडा, जिल्हा ग्राम विकास निधी अंतर्गत अंशदान व्याज वाटप, रेकॉर्ड सॉर्टिंग व झिरो पेंडन्सी, राष्ट्रीय लोकअदालतीद्वारे ग्रामपंचायत कर वसुली, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, कॅन्सर साक्षर सातारा, सुरक्षित मातृत्व अभियान, सेंद्रीय शेतीवर मुलांच्या सहली, सेंद्रीय शेती करणा-या शेतक-यांच्या कार्यशाळा, दत्तक शाळा आदी उपक्रम प्रभावीपणे राबविले आहेत. त्यांच्या अनेक उत्कृष्ट उपक्रमांची दखल राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर घेण्यात आली असून त्याबद्दल त्यांना गौरविण्यातसुध्दा आले आहे.
                                                            00000000000  

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी