विषबाधित शेतकरी, शेतमजूरांना आर्थिक मदत द्या - गृहराज्यमंत्री हंसराज अहीर

यवतमाळ, दि. 30 : जिल्ह्यात किटकनाशकाच्या फवारणीमुळे मोठ्या प्रमाणात शेतकरी आणि शेतमजूर बाधित झाले आहेत. हा अतिशय गंभीर विषय आहे. यापुढे अशा घटना घडणार नाहीत, याची काळजी घ्यावी. तसेच शासकीय यंत्रणेकडून विषबाधित शेतकरी आणि शेतमजुरांना आर्थिक मदत देण्याचे प्रयोजन करून तसा प्रस्ताव तात्काळ सादर करावा, अशा सूचना केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी केल्या.
येथील विश्रामगृहात जलयुक्त शिवार, कृषी विभाग, सिंचनाची स्थिती, कायदा आणि सुव्यवस्था आदी विषयांबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी आमदार संजीवरेड्डी बोतकुरवार, आमदार राजू तोडसाम, अतिरिक्त जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, अधिक्षक अभियंता राजेंद्र काटपल्लीवार, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी नवनाथ कोळपकर आदी उपस्थित होते.
विषबाधीत शेतकरी आणि शेतमजूरांचा गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत समावेश करता येईल का, अशी विचारणा करून गृहराज्यमंत्री अहीर म्हणाले, शेतक-यांसोबतच बाधित शेतमजूरांनासुध्दा आर्थिक मदत मिळाली पाहिजे. फवारणी करतांना विषबाधा होऊ नये म्हणून कृषी विभाग काय उपाययोजना करीत आहे. जिल्ह्यात एकूण 1200 कृषी केंद्र आाहेत. या केंद्रांवर केंद्र चालकांनी शेतक-यांसाठी मार्गदर्शक सुचनांचे बॅनर लावावे. तसेच त्यांना पत्रके वाटायला सांगा. नकली बियाणांची विक्री करणा-यांवर गुन्हे दाखल करा. तसेच काळाबाजार करणा-यांचा तात्काळ बंदोबस्त करा. येत्या रब्बी हंगामाचे कृषी विभागाने काय नियोजन केले आहे. तूर खरेदी, कापूस खरेदीचे नियोजन करा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात बांधलेल्या बंधा-याचे खोलीकरण करून या बंधा-यांना आवश्यकतेनुसार भिंत बांधली तर कृषी क्षेत्रासाठी ती संजीवनी ठरेल. यवतमाळ जिल्ह्यात सिंचनाची स्थिती, नदी, नाले, शेतीची पत, मेहनत करणारा शेतकरी आदी बाबी आहेत. शेतक-यांना भाजीपाला, दुग्ध व्यवसाय आदी जोडधंदे देणे आज काळाची गरज आहे. या योजनांचा फायदा शेतक-यांना द्या. शेतक-यांच्या आत्महत्या थांबविणे हे सरकारचे प्राधान्य आहे. जिल्ह्यात बांधलेल्या बंधा-यांचा क्षमतेने उपयोग झाला पाहिजे. बॅरेजेससाठी केंद्राकडून आणखी अर्थसहाय्य आणता येईल. आपापल्या कामाला न्याय देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे, असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेंतर्गत किती शेतक-यांची नोंदणी झाली, गतवर्षी त्यांना किती रक्कम शासनातर्फे देण्यात आली. खरीपासाठी खतांची स्थिती काय, खतांसाठी रॅक किती लागल्या. कृषीसमृध्दी प्रकल्प, जलयुक्त शिवार, कोल्हापूरी बंधा-यांची स्थिती, बेंबळा, अरुणावती प्रकल्पांचा आढावा घेतला.
कायदा व सुव्यवस्था विषयाबाबत त्यांनी जिल्हा पोलिस अधिक्षक एम.राजकुमार, उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी आणि उप-प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याशी चर्चा केली. यावेळी त्यांनी अवैध दारुविक्री, दारुबंदी आढावा, अवैध गो-वाहतूक आदी विषयांबाबत सुचना केल्या. तत्पूर्वी केंद्रीय गृहराज्यमंत्री यांनी वणी येथील सेवानगर येथे स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत स्वच्छता उपक्रम राबविला. यावेळी त्यांनी वणी आणि मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली. ट्रामा केअर सेंटरमध्ये घेतलेल्या आढावा बैठकीत त्यांनी डॉक्टरांना स्वच्छता ठेवण्याच्या सुचना केल्या. यावेळी त्यांनी औषधींचा साठा, रिक्त जागा, 108 आदींबाबत आढावा घेतला. बैठकीला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. डी.जी.चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. टी.जी.धोटे यांच्यासह आदी उपस्थित होते.
                                                               000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी