वृक्ष लागवड मोहिमेसाठी आतापासून नियोजन करा - जिल्हाधिकारी डॉ. देशमुख

यवतमाळ, दि. 25 : पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी राज्य शासनाने सुरू केलेली वृक्ष लागवड मोहीम ही अतिशय महत्वाकांक्षी योजना आहे. देशातील इतरही राज्ये महाराष्ट्राच्या या योजनेचे अनुकरण करीत आहे. पुढील वर्षी म्हणजे 2018 साली संपूर्ण राज्यात 13 कोटी वृक्ष लागवड मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या अंतर्गत आपल्या जिल्ह्यात 59 लक्ष वृक्ष लागवड करायची आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणांनी या मोहिमेला यशस्वी करण्याकरीता आतापासून नियोजन करावे, अशा सुचना जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात वृक्ष लागवड मोहिमेच्या संदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, मुख्य वनसंरक्षक जी.टी.चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, यवतमाळचे उपवनसंरक्षक बी.एन.पिंगळे, पुसदचे उपवनसंरक्षक अरविंद मुंढे उपस्थित होते.
केवळ शासकीय उद्दिष्टासाठी वृक्ष लागवड मोहिमेकडे बघू नका, असे सांगून जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले, गत दोन वर्षांपासून राज्य शासनाने ही मोहीम हाती घेतली आहे. 2016 मध्ये 2 कोटी, 2017 मध्ये 4 कोटी आणि आता 2018 मध्ये 13 कोटीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. वृक्ष लागवडीबाबत नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती झाल्यामुळे पहिल्या दोन्ही वर्षी शासनाचे विभाग, विविध सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या सहकार्याने ही मोहीम आपण यशस्वी करू शकलो. गत वर्षी जिल्ह्याला 23 लक्ष वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले होते. उद्दिष्टापेक्षा 10 लक्ष जास्त म्हणजे 33 लक्ष वृक्षलागवड आपण जिल्ह्यात केली आहे. ही  नक्कीच आनंदाची बाब आहे. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी तसेच त्यांच्या हद्दित येत असलेल्या शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र आदी ठिकाणी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. तसेच तालुकानिहाय सर्व शासकीय यंत्रणांनी विविध सामाजिक संघटनांना सोबत घेऊन आतापासून त्याचे योग्य नियोजन करावे. मुख्यमंत्री विकास दूत असलेल्या 23 ग्रामपंचायती अंतर्गत येणा-या 54 महसूली गावात विकास दूतांमार्फत नागरिकांमध्ये चांगली जनजागृती होऊ शकते. केवळ वृक्ष लागवड करून नव्हे तर त्याच्या संगोपणासाठीसुध्दा सर्वांनी पुढकार घ्यावा. समाजाच्या सर्व घटकांना सोबत घेऊन वृक्ष लागवडीचा कार्यक्रम मिशन मोडवर घेतला तर नक्कीच आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उद्दिष्ट साध्य होईल, असा विश्वास जिल्हाधिका-यांनी व्यक्त केला.
दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा आढावा : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजनेचा आढावा घेतला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कोळपकर, समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्त किशोर भोयर, विशेष अधिकारी पियुष चव्हाण उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी योजनेसाठी खरेदी करण्यात आलेली जमीन, अतिक्रमीत जमिनीबाबतची सद्यस्थिती, जमिनीचा मिळणारा मोबदला, स्थळ पाहणी करतांना राबविण्यात येणारी पध्दत, वहिती योग्य आणि ताबा आदी बाबींचा आढावा घेतला. तसेच जमीन खरेदी करण्यापूर्वी सर्च रिपोर्ट घेऊन जमीन खरेदी करावी. जागेसंदर्भात संबंधित तलाठ्याचा मूक पाहणी अहवाल आवश्यक असून नायब तहसीलदारांनीसुध्दा स्थळ पाहणी करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी जिल्हा दक्षता व नियंत्रण समिती, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना आणि कृषी समृध्दी प्रकल्पाचा आढावा घेतला. बैठकीला अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, सहायक नियोजन अधिकारी मनोज गेडाम, सहायक पोलिस निरीक्षक एम.के. नंदागवळी यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.
                                                            000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी