सर्वांच्या सहकार्याने काम केल्याचा आनंद - कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह

Ø जिल्हाधिकारी कार्यालयात निरोप समारंभ

यवतमाळ, दि. 3 : जिल्हाधिका-याचे काम हे केवळ त्याचे एकट्याचे नसून ते एक टीमवर्क असते. या टीमवर्क मुळेच उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून सन्मान करण्यात आला. यात आपल्या सर्वांचे मोलाचे योगदान आहे. भंडारा, परभणी आणि यवतमाळ येथे शेतक-यांच्या कामाबद्दल जी संवेदनशीलता दाखविली कदाचित त्यामुळेच शासनाने कृषी आयुक्त्‍ म्हणून नेमणूक केली. तिकडे जात असलो तरी आपल्या सर्वांच्या सहकार्याने यवतमाळ जिल्ह्यात चांगले काम केल्याचा आनंद आहे, असे प्रतिपादन यवतमाळचे मावळते जिल्हाधिकारी आणि राज्याचे कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा प्रशासनाच्या वतीने आज (दि.3) आयोजित निरोप समारंभाला उत्तर देतांना ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला तर प्रमुख अतिथी म्हणून पोलिस अधीक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधीक्षक जाधव, अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत, अधिक्षक अभियंता काटपिल्लेवार, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मेहेत्रे, उपवनसंरक्षक मुंढे, पिंगळे उपस्थित होते.
दोन वर्षांत कामामुळे इतरांची मने दुखावली असेल त्याबद्दल क्षमा मागून कृषी आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले, मनात कोणाबद्दलही द्वेष ठेवला नाही. माझ्या कार्यकाळात कोणीही अडचणीत येणार नाही, याची काळजी घेतली. नकारात्मक काम करणा-यांच्या मनात अधिका-यांची भीती असावी. आदरयुक्त भीतीसुध्दा चांगल्या कामासाठी आवश्यक असते. जिल्ह्यातील नागरिकांनी हक्काने आपल्या समस्या सांगितल्या. प्रशासनाच्या माध्यमातून त्या सोडविण्याला आपण नेहमी प्राधान्य दिले. अधिका-यांनी आपली क्षमता ओळखून काम करणे गरजेचे आहे. काम करणा-यांचीच किंमत होत असते. जिल्ह्यातील प्रत्येक विभागाला सक्षम करण्यासाठी आणि यंत्रणेला सरळ करण्यासाठी काम करीत राहिलो. यात सर्वांचे योगदान लाभले. स्वत:च्या क्षमतेनुसार काम करून नागरिकांना समाधानी करू शकलो, याचा आनंद आहे. अधिका-यांनी शिकण्याची प्रवृत्ती नेहमी ठेवली पाहिजे. प्रशासनामध्ये वर्क संस्कृती रुजविणे गरजेचे आहे. आपल्या वागणुकीवर लोकांचा व्यवहार अवलंबून असतो. लोकांन नेतृत्व देणे, नवनवीन कल्पना देणे हेच उद्दिष्ट कायम ठेवले पाहिजे. आपल्या सहकार्यासाठी आणि आपल्याकडून मिळालेल्या प्रेमाचा सदैव ऋणी राहील, असे सचिंद्र प्रताप सिंह म्हणाले. यावेळी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एस.पी.सिंह यांना चांदीची गणेशाची मूर्ती प्रदान करून त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी केले. संचालन तहसीलदार सचीन शेजाळ यांनी तर आभार उपविभागीय अधिकारी स्वप्नील तांगडे यांनी मानले. कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी, संबंधित तहसीलदार, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
                                                                  000000000 

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी