सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशिल - महसूल राज्यमंत्री संजय राठोड

जागेवरच निर्णय आणि तक्रारींचा निपटारा

यवतमाळ, दि. 17 : लोकप्रतिनिधी या नात्याने व शासनाचा प्रतिनिधी म्हणून सर्वसामान्यांचे प्रश्न प्राधान्याने सोडवून त्यांना समाधान देणे, यासाठी मी सदैव प्रयत्नशिल आहे, असे प्रतिपादन महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी येथे केले. स्थानिक शहीद जिड्डेवार भवन येथे सुवर्ण जयंती महाराजस्व अभियानांतर्गत आयोजित तालुकास्तरीय समाधान शिबिरात ते बोलत होते. 
यावेळी आ. राजू तोडसाम, जिल्हा परिषद सदस्य गजानन बेजनकीवार, उपविभागीय अधिकारी नितीन हिंगोले, पंचायत समिती सभापती इंदू मिसेवार, उपसभापती संतोष बोडेवार, सदस्य अनुराधा वेट्टी, नगर परिषद उपाध्यक्ष सुनंदा देशमुख, सदस्य प्रा. मंगेश होटे आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना ना.संजय राठोड म्हणाले, महसूल विभाग हा शासन, प्रशासनाचा कणा आहे. या विभागाशी शेतकरी, विद्यार्थी, सर्वसामान्य जनतेचा दररोज थेट संबंध येतो. प्रशासन गतिमान होऊन जनतेच्या तक्रारी निकाली निघाव्या आणि त्यांचा वेळ, श्रम, पैशाची बचत व्हावी यासाठी आपण महसूल विभागांतर्गत समाधान शिबीर सुरू केले आहे. पहिल्या टप्प्यात उपविभागीय स्तरावर हे शिबीर घेण्यात आले. त्यात एक लाखांवर तक्रारी प्राप्त झाल्या. त्यातील ७५ हजाराच्या जवळपास तक्रारींचा निपटारा करण्यात आला. प्रलंबित तक्रारींवर कार्यवाही सुरू आहे, असे ना. राठोड यांनी सांगितले. 
आजच्या समाधान शिबिरात ४६४ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यात पंचायत समितीच्या सर्वाधिक २५७ तक्रारी होत्या. तहसील ७६, नगर परिषद २७, वनविभाग १७, महावितरण १३, भूमी अभिलेख ११, पोलीस, उपविभागीय अधिकारी प्रत्येकी ७, सहकार विभाग, उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकी ४ अशा विविध विभागांच्या तक्रारींचा त्यात समावेश आहे. घरकुल, सातबारा, पांदण रस्ते, वीज जोडणी, अंत्योदय, सिंचन विहीर आदी तक्रारींसंदर्भात अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्यांचा तत्काळ निपटारा करण्याचे आदेश यावेळी ना. संजय राठोड यांनी दिले. प्रशासनाकडे तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती किती दिवसात निकाली काढावी, याच्या मार्गदर्शक सूचना शासनाने दिल्या आहेत. दिलेल्या मुदतीत अधिकारी, कर्मचारी प्रकरण निकाली काढत नसेल तर, अशा कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश ना. राठोड यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना दिले. ग्राम पंचायतीच्या निधीतून दिव्यांगांसाठी तीन टक्के निधी खर्च होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या. या प्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश ना. राठोड यांनी यावेळी दिले. 
महसूल विभागाने गेल्या तीन वर्षात कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करून जनहिताचे अनेक निर्णय घेतले, असे ना. राठोड म्हणाले. आजच्या शिबिरात प्राप्त झालेल्या तक्रारींवर तातडीने नियमानुसार कार्यवाही करून त्या निकाली काढण्याचा प्रयत्न केला. प्रलंबित तक्रारीही लवकरच निकाली काढल्या जातील. तसे तक्रारकर्त्यांना कळविले जाईल, असेही त्यांनी सांगितले. शिबीराला नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
0000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी