देशाच्या प्रगतीसाठी स्वच्छता आवश्यक - पालकमंत्री मदन येरावार

स्वच्छता ही सेवा अभियानाचा जिल्ह्यात लासिना येथून शुभारंभ

यवतमाळ, दि. 15 : संपूर्ण जग भारताकडे भविष्यातील महासत्ता म्हणून बघत आहे. अनेकांच्या बलिदानातून मिळालेल्या स्वराज्याचे सुराज्यात रुपांतर होण्यासाठी शासन आणि लोकसहभागातून प्रयत्न केले जात आहे. सामाजिक, आर्थिक प्रगती करतांना निरोगी व सुदृढ राहणे आवश्यक आहे. त्यासाठी स्वच्छतेची गरज आहे. कारण स्वच्छतेशिवाय देशाची प्रगती होऊ शकत नाही, असे प्रतिपादन पालकमंत्री मदन येरावार यांनी केले.
यवतमाळ तालुक्यातील लासिना ग्रामपंचयतीमध्ये जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता सहाय्य्‍ विभागाच्या वतीने आयोजित स्वच्छता ही सेवा अभियानाचे उद्घाटन करतांना ते बोलत होते. यावेळी मंचावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार सिंगला, अतिरिक्त मुख्याधिकारी शरद कुलकर्णी, यवतमाळचे तहसीलदार सचिन शेजाळ, जि.प.उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजकल्याण सभापती प्रज्ञा भुमकाळे, सभापती नंदिणी दरणे, लासिनाच्या सरपंचा अलका कांबळे, उपसरपंच कनैय्या राठोड उपस्थित होते.
देशाच्या विविध धोरणांची घोषणा स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून होत असते. मात्र पहिल्यांदाच देशातील 125 कोटी जनतेला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्यावरून स्वच्छतेचा संदेश दिला. महात्मा गांधींनी क्वीट इंडिया आणि क्लीन इंडिया तर संत गाडगे बाबा यांनीसुध्दा स्वच्छतेचा मंत्र दिला. त्यासाठी ते प्रत्येक गावात जाऊन आंगण, मंदीर, शाळा, आजूबाजूचा परिसर स्वच्छ करीत होते. म.गांधी, संत गाडगे बाबा आणि पतंप्रधानांनी केलेल्या स्वच्छतेच्या आवाहनात सहभागी होणे आपली प्राथमिकता आहे. ही एक लोकचळवळ आहे. देशभक्ती म्हणून या अभियानाकडे नागरिकांनी लक्ष द्यावे. आजपासून सुरु झालेले हे अभियान 2 ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे. मात्र त्यानंतरही नेहमीसाठी स्वच्छतेचे महत्व ठेवा. महानायक अमिताभ बच्चनसुध्दा स्वच्छता अभियानाचे दूत झाले आहे. मी, माझं गाव निरोगी, सुदृढ ठेवील, उघड्यावर कोणालाही शौचालयाला जाऊ देणार नाही. याबाबत गावक-यांमध्ये जनजागृती करील. तसेच हागणदारीमुक्त जिल्हा होण्यासाठी स्वच्छतेची दिलेली शपथ प्रामाणिकपणे पाळील, असा संकल्प प्रत्येकाने करणे गरजेचे आहे, असे पालकमंत्री मदन येरावार यांनी सांगितले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख म्हणाले, स्वच्छतेच्या लोकचळवळीत सर्वांनी सहभागी व्हावे. लोकांच्या सहभागाशिवाय या मोहिमेला अपेक्षित यश मिळणार नाही. जिल्ह्यात आतापर्यंत 70 हजार वैयक्तिक शौचालय बांधून झाले आहे तर अजूनही 1.50 लक्ष शौचालये बांधायची आहेत. केवळ शासनाच्या अनुदानावर अवलंबून न राहता आपणही त्यात योगदान दिले तर मार्च 2018 पर्यंत हा जिल्हा संपूर्ण हागणदारीमुक्त होईल, असे जिल्हाधिकारी डॉ. देशमुख म्हणाले.  
यावेळी पालकमंत्र्यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली. तत्पूर्वी मान्यवरांनी नलूबाई पारेकर यांच्या घरी बांधण्यात येत असलेल्या शौचालयाच्या भिंतीचे बांधकाम तर रामकृष्ण दुधे यांच्या घरी नवीन शौचालयाच्या बांधकामाचे भुमिपूजन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री मदन येरावार यांनी स्वच्छतेसंदर्भात जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांनी काढलेल्या रॅलीला हिरवी झेंडी दाखविली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेंद्र भुयार यांनी केले. संचालन मोरेश्वर पुण्यशास्त्री यांनी तर आभार गटविकास अधिकारी एस.एस. मानकर यांनी मानले. कार्यक्रमाला शिक्षधाधिकारी चिंतामण वंजारी, जिल्हा परिषदेचे सदस्य, अधिकारी आणि गावकरी उपस्थित होते.
                                                            000000000

Comments

Popular posts from this blog

औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये शिकाऊ उमेदवार भरती मेळावा

जिल्हा परिषद शाळांसाठी 484 कंत्राटी शिक्षण स्वयंसेवकांची भरती होणार

जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता ; हवामान विभागाकडून येलो अलर्ट जारी